Latest

अहिल्यानगरमध्ये कपाशीच्या शेतात चक्क गांजाची लागवड ! पोलीसही झालेत शॉक… कुठे घडला हा प्रकार ?

पाथर्डी तालुक्यातील जांभळी शिवारात कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाथर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ११ किलो ६०० ग्रॅम वजनाची गांजाची पाच झाडे जप्त केली.

या प्रकरणी किशोर बन्सी जायभाये याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत २ लाख ३२ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

२३ सप्टेंबर रोजी अवैध धंद्यांविरोधात माहिती घेत असताना पोलिसांना जांभळी शिवारातील या शेताबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने पंचांसह शेतात छापा टाकला. कपाशीच्या पिकामध्ये गांजाची झाडे आढळताच ती जप्त करण्यात आली.

विशेष म्हणजे, पोलिसांच्या तपासात जायभाये याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच तो सराईत गुन्हेगार असून २०२४ मध्ये त्याला अहिल्यानगरसह बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. आता या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button