
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सहकार विभागाने निवडणुकीचा प्रारूप कार्यक्रम तयार करून अंतिम मंजुरीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवला आहे.
प्रस्तावित निवडणूक कार्यक्रमानुसार 2 नोव्हेंबरला मतदान, तर 3 नोव्हेंबरला मतमोजणी होण्याची शक्यता आहे. तसेच 28 ऑक्टोबरपासून सलग पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल. गरज भासल्यास 21 संचालकांच्या जागांसाठी 2 नोव्हेंबरला मतदान घेतले जाईल.
मात्र, या तारखांवर अंतिम शिक्कामोर्तब अद्याप झालेले नाही. प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतरच निवडणुकीच्या तारखांवर अधिकृत शिक्का बसेल.
दरम्यान, विभागीय सहनिबंधक संभाजीराव निकम यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता प्राधिकरणाच्या मंजुरीकडे इच्छुक उमेदवार आणि राजकीय गटांचे लक्ष लागले आहे. दिवाळीपूर्वीच निवडणूक होणार असल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणाला चांगलाच रंग चढण्याची शक्यता आहे.





