
पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शेतीपंपांच्या मोटारी, केबल आणि कृषी साहित्य चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत.
आता भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या कुटुंबाच्या कासार पिंपळगाव येथील शेतातही चोरी झाल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.
५ सप्टेंबरच्या संध्याकाळी विहिरीवरील केबल व्यवस्थित होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे सहा हजार रुपये किमतीची १०० फूट केबल गायब असल्याचे समोर आले.
याच परिसरातील ताराचंद राजळे आणि मच्छिंद्र राजळे यांच्या विहिरीवरील केबलही चोरट्यांनी लांबवल्या. या तिन्ही घटनांमध्ये एकूण २२० फूट केबल आणि सुमारे १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, कोपरे येथे राजेंद्र उघडे यांच्या शेडमधून तीन शेळ्याही चोरीला गेल्या. पाथर्डी तालुक्यात याआधीही शेतीपंपांच्या मोटारी, केबल आणि कृषी साहित्य चोरीच्या घटना घडल्या आहेत.
तक्रारी होऊनही चोऱ्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता आमदारांच्या शेतातील चोरीनंतर तरी पोलिस प्रशासन या टोळीचा बंदोबस्त करणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.





