
कर्जतच्या स्थानिक राजकारणावरून सचिन घुले यांनी सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात भूमिका मांडायच्या आणि कर्जत नगरपंचायतीच्या सत्तेच्या समीकरणात मात्र एकत्र यायचे, हा नेमका कोणता राजकीय खेळ आहे, हा प्रकार नेमका काय आहे? कर्जतच्या राजकारणात सुरू असलेली ही ‘नूरा कुस्ती’ तर नाही ना?
असा सवाल घुले यांनी उपस्थित केला. सत्तेसाठी एकत्र येत असाल, तर जनतेसमोर विरोधाचे चित्र का उभे करायचे, असा थेट प्रश्नही त्यांनी केला. कर्जतच्या विकासाचे नेतृत्व नेमके सभापती प्रा. राम शिंदे करणार की आमदार रोहित पवार, हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.
पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा, निधीचे नियोजन आणि कामांची कालमर्यादा जनतेसमोर जाहीर करावी, असे घुले म्हणाले. पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, स्वच्छता, वाहतूक, अतिक्रमण आणि पार्किंग यांसारख्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना कधी होणार, याचे उत्तरही सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.





