अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अशा वळणावर आली आहे, जिथे रोज नवीन समीकरणं समोर येत आहेत. जिल्ह्यातील तब्बल २३८ संस्थांनी ठरावच दाखल न केल्यामुळे मतदारांची संख्या घटली. आणि शिल्लक राहिलेल्या मतदारांना आता ‘लाखमोलाचा भाव’ आलाय. १९७२ च्या भीषण दुष्काळात ही निवडणूक जशी बिनविरोध झाली होती, तसाच पॅटर्न यंदाही राबवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या ‘सहमती एक्सप्रेस’च्या हालचाली पडद्याआडून वेगाने सुरू आहेत. पण आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आहे. कारण, आज आपण पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या सर्वच्या सर्व २१ जागांवर कोणते चेहरे असणार, याची सर्वात खात्रीशीर संभाव्य यादी नावासह आणि मतदारसंघासह प्रसिद्ध करत आहोत! १४ तालुक्यांचे १४ सम्राट कोण असणार? आणि उर्वरित ७ जागांवर कोणता पेच निर्माण झालाय? या संपूर्ण राजकीय समीकरणाचा पडदा आज आपण उठवणार आहोत.
मित्रांनो, जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी १४ जागा या विविध कार्यकारी सेवा सोसायटी मधून येतात. जर निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर प्रत्येक तालुक्यातून एकच नाव अंतिम करावे लागेल. यंदाची स्थिती पाहिली तर, फक्त या १४ जागांसाठीच नाही तर राखीव सात जागांवरही तेवढीच चुरस वाढली आहे. निवडणूक बिनविरोध करायची म्हटल्यास, राजकीय सोय करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सोसायटी मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यातही कुणी ऐकणार नसेल तर, शेतीपुरक, बिगरशेती पर्यायांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय नाराजांचे पुनर्वसन करण्यासाठी ओबीसी, दोन महिला राखीव अशा तीन जागांचाही पर्याय खुला आहे. आता याच गमतीजमती पाहता, आपल्या सूत्रांनुसार आणि राजकीय घडामोडींनुसार या १४ जागांवर कोणत्या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत हे एकदा पाहू :
१. श्रीगोंदा तालुका: यंदा या मतदारसंघातून सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळतेय. इथे माजी आमदार राहुल जगताप यांच्याऐवजी भाजपचे प्रतापसिंह पाचपुते आणि नागवडे पॅनलचे प्रमुख राजेंद्र नागवडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यांच्यात तडजोड होऊन एकच नाव समोर येईल.
२. नगर तालुका: इथे जुन्या पिढीऐवजी आता तरुण नेत्त्वाकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव सोसायटी मतदारसंघातून आघाडीवर आहे.
३. राहाता तालुका : नामदार राधाकृष्ण विखे पाटील किंवा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील. विखे यांच्याकडे चेअरमनपदाची माळ जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
४. संगमनेर तालुका : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात स्वतः किंवा त्यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार चर्चेत आहेत.
५. कोपरगाव तालुका : इथे नेहमीप्रमाणे काळे-कोल्हे संघर्ष आहे. परंतु, ‘सहमती एक्सप्रेस’मध्ये आमदार आशुतोष काळे किंवा आमदार विवेक कोल्हे यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
६. राहुरी तालुका : माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे किंवा अरुण तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे.
७. नेवासा तालुका : माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचं नाव फिक्स समजले जात आहे.
८. पाथर्डी तालुका : भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी येथे निश्चित मानली जातेय.
९. शेवगाव तालुका : माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते चंद्रशेखर घुले यांचे नाव आघाडीवर आहे.
१०. कर्जत तालुका: कर्जत तालुक्यातून महायुतीच्या स्थानिक तडजोडीतून विखे-पाटील समर्थक मातब्बर चेहरा समोर आणला जाईल अशा शक्यता आहेत.
११. जामखेड तालुका : स्थानिक राजकीय समझोत्यानुसार महायुती किंवा मविआ समर्थित बडा चेहरा समोर येईल. शक्यतो सभापती राम शिंदे यांचे नाव जामखेड तालुक्यातून पुढे येऊ शकते.
१२. पारनेर तालुका: जिथे सर्वाधिक चुरस आहे. पण तडजोड झाल्यास सुजीत झावरे, आ. काशिनाथ दाते यांच्यापैकी एक प्रतिनिधी संचालक होईल, अशा शक्यता आहेत.
१३. अकोले तालुका : अमित भांगरे किंवा वैभव पिचड येथे चर्चेत आहेत. मात्र, इथे सीताराम गायकर यांनी शेवटच्या क्षणी स्वतःचा ठराव केल्याने वैभव पिचड यांना रोखण्यासाठी पुन्हा राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे.
१४. श्रीरामपूर तालुका : भानुदास मुरकुटे यांचे नाव येथे चर्चेत आहे.
आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. सोसायटीच्या १४ जागा बिनविरोध करायच्या असतील, तर उरलेल्या ७ जागांवर बड्या नेत्यांची राजकीय सोय करावी लागेल. या ७ जागांवर कोणती संभाव्य नावे आणि लढती निश्चित झाल्यात, ते नावासह समजून घ्या:
१. बिगरशेती मतदारसंघ (१ जागा) :
इथे सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठी ‘टफ फाईट’ रंगतेय. पतसंस्था फेडरेशनवर पकड असलेले प्रशांत सबाजीराव गायकवाड यांची उमेदवारी अंतिम समजली जात असून, त्यांना सुनेत्रा पवार यांचा शब्द दिल्याच्या चर्चा आहेत. मात्र, त्यांना थेट टक्कर देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन अरुणकाका जगताप यांचे नाव चर्चेत आहे. सचिन जगतापांची मनधरणी झाली तरच गायकवाडांचा मार्ग सुकर होईल, नाहीतर ऐनवेळी मालपाणी, घुले किंवा सुवर्णा कोतकर यांचे नाव पुढे येऊ शकते.
२. शेतीपूरक मतदारसंघ (१ जागा) :
गेल्या वेळी ही जागा कोपरगावच्या आशुतोष काळे यांच्याकडे होती. काळे-कोल्हे संघर्ष टाळण्यासाठी गेल्यावेळी या जागेसाठी तडजोड झाली होती. यंदा जर कोपरगावची जागा सोसायटीतून ॲडजेस्ट झाली, तर शेतीपूरकची जागा श्रीगोंदा किंवा संगमनेरकडे जाऊ शकते.
३ व ४. महिला राखीव मतदारसंघ (२ जागा) :
या दोन जागांसाठी दिग्गजांमध्ये प्रचंड चुरस आहे. यामध्ये अनुराधा नागवडे, प्रतिभा पाचपुते, आणि प्रणोती जगताप यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. याशिवाय तडजोडीत कोपरगावच्या स्नेहलता कोल्हे किंवा चैताली काळे, तसेच सुवर्णा कोतकर आणि रत्नामाला लंघे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.
५. इतर मागासवर्गीय (१ जागा):
गेल्या वेळी इथे बाळासाहेब थोरातांनी श्रीरामपूरच्या करण ससाणे यांना संधी दिली होती. पण यंदा विखे पाटील काँग्रेसच्या ससाणेंना पुन्हा संधी देतील की स्वतःच्या कार्यकर्त्याची सोय लावतील, यावर शंका आहे. जर जागा बदलली, तर जुन्या संचालकांपैकी अण्णासाहेब म्हस्के यांची ओबीसी जागेवर वर्णी लावली जाऊ शकते.
६. भटक्या विमुक्त जाती-जमाती (१ जागा):
ही जागा गेल्या काही वर्षांपासून संगमनेरच्या ताब्यात आहे. थोरातांचे निकटवर्तीय गणपतराव सांगळे हे सलग दोन टर्म संचालक आहेत, त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता दाट आहे.
७. अनुसूचित जाती/जमाती – एससी/एसटी (१ जागा) :
गतवेळी इथून अमित भांगरे यांना संधी मिळाली होती. वैभव पिचड आणि आमदार किरण लहामटे यांना बाजूला ठेवण्यासाठी यंदाही अमित भांगरे यांच्याच नावाचा पत्ता पुन्हा खेळला जाण्याची चिन्हे आहेत.
मित्रांनो, हा बिनविरोधचा पॅटर्न नगर जिल्ह्यासाठी नवीन नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी तब्बल १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. यंदाही काळे, कोल्हे, गडाख, तनपुरे, राजळे, विखे, थोरात, पाचपुते आणि नागवडे हे सर्वच नेते याच ‘सहमत एक्सप्रेस’चे प्रवासी असणार आहेत. पक्षाच्या भिंती बाजूला सारून बँकेची सत्ता आपल्याच हातात ठेवण्याचा हा पॅटर्न यंदा १७ वरून थेट २१ जागांपर्यंत पोहोचणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर मित्रांनो, ही आहे ती २१ संभाव्य संचालकांची सर्वात पहिली आणि खात्रीशीर यादी, ज्या नावांभोवती सध्या अहिल्यानगर जिल्हा बँकेची संपूर्ण निवडणूक फिरतेय. नगर तालुक्यातून अक्षय कर्डिले आणि श्रीगोंद्यातून प्रतापसिंह पाचपुते व नागवडे यांच्या एन्ट्रीने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.





