
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ! महाराष्ट्रातील तब्बल १८ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट… आता मंगळवारी सरकार मोठा निर्णय घेणार आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे.
अहिल्यानगरसह १८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
या यादीत अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबारचा समावेश आहे.
सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद यांसारख्या पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम झाला आहे. काही भागांत जनावरांच्या चाऱ्याची समस्याही गंभीर बनली आहे. नागपूर आणि अमरावतीतील संत्रा उत्पादकांनाही फटका बसला आहे.
नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणीसोबत उपग्रह छायाचित्रांचाही वापर केला जात आहे. जिल्ह्यांकडून सोमवारपर्यंत सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदत आणि उपाययोजनांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.





