
राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. शरद पवार गटाने अगदी शेवटच्या क्षणी कुटनितीचं राजकारण केल्याचा आरोप झाला. माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणुकीतून माघार घेतली. मतदारसंघातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपने त्यांना दिले. त्यावर तनपुरेंनी विश्वास ठेवला. आता हा विश्वास ठेवण्याचे ठोस कारण होते, ती म्हणजे सत्ता… देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे.
ज्याची सत्ता असेल तोच विकासकामे व विकासनिधीचा शब्द पूर्ण करतो. हे तनपुरेंना माहित होते. त्यामुळे भाजपने दिलेले शब्द शंभर टक्के पूर्ण होतील, ही खात्री तनपुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आहे. मग माजीमंत्री राहिलेल्या तनपुरेंना ही खात्री असेल तर शरद पवार गटाने उमेदवार देऊन नेमकं काय साध्य केलं? हाही प्रश्नच आहे. विकासकामांसाठी निधी हवा असतो. तो निधी कोण देतं, तर सरकार… मग राहुरीच्या विकासकामांना जर भाजपकडून निधी मिळणार असेल, तर इतर पक्षाच्या उमेदवारा निवडून देऊन फायदा काय..?
जे तनपुरेंना कळालं, ते इतर उमेदवारांना का कळू नये? पण आता ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात आल्यावर मतदारांनाही हे पटायला लागलंय. त्यामुळेच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाची वाढली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, राहुरीच्या इतिहासातील विक्रमी विजय ते मिळवतील.
गुरुवारी नगर तालुक्यातील जेऊर येथे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभा झाली. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रसाद लाड, प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुजय मोहिते, आ. विक्रम पाचपुते, आ. मोनिका राजळे आदी नेते उपस्थित होते. भाजपच्या या सगळ्या नेत्यांनी ही निवडणूक हलक्यात न घेण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. बूथवाईज जास्तीत जास्त मतदानाचे नियोजन करण्याचा संकल्प करण्यात आला.
मुळात, ज्येष्ठ नेते व विद्यमान आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून अक्षय कर्डिले यांना बिनविरोध निवडून देणे गरजेचे होते. परंतु तरीही शरद पवार गटाने, अपरिपक्व राजकीय खेळी करत या जागेसाठी उमेदवार दिला. मतदारसंघातील भावनिक लाट, मतदारांची मानसिकता, कर्डिलेंच्या निधनानंतर तयार झालेले दुःखाचे वातावरण… या सगळ्यांचा विचार विरोधकांकडून झाला नाही. राहुरीकरांना हे सगळं पटल नाही. ही निवडणूक लादल्यामुळे शरद पवार गट व इतर विरोधकांवर जनतेचा रोष वाढला. या सगळ्या मुद्यांना भाजपच्या वरिष्ठांनी या सभेत हात घातला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अक्षय कर्डिले पक्ष संघटना मजबूत करत आहेत. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांचे वारस म्हणून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक अंतिम टप्प्यात असून प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे पुढाकार घ्यावा. ही प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने कोणीही गाफील राहू नये. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राहिलेली विकासकामे करण्याची भाजपची जबाबदारी वाढली आहे.
ती नक्कीच पूर्ण केली जाईल. जिल्ह्याच्या विकासासाठी पाण्याच्या साखळी योजना, वांबोरी चारी योजना, सुरू असून भविष्यात यासारख्या कामांचा वेग वाढविला जाईल. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज लक्षात घेऊन मुळा धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यामुळे सुमारे तीन टीएमसीने पाणीसाठा वाढेल आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल. संरक्षण विभागाचे कारखाने नगर जिल्ह्यात उभारले जात असून, बेलवंडी येथे 600 एकर जागा देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात 30 ते 35 हजार युवकांना रोजगार मिळणार असून त्यासाठी पुणे-मुंबईकडे जाण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
सभापती राम शिंदे यांनीही या मतदारसंघात 100 टक्के मतदान घडवून आणण्याचे आवाहन केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी घराघराज जाऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. आ. राजळे, आ. पाचपुते यांचीही यावेळी भाषणे झाली. खरंतर स्व. शिवाजीराव कर्डिले हे सामान्यांचे नेते होते. त्यामुळे ही निवडणूक सामान्यांनीच हाती घेतली असल्याचे सभेला मिळालेल्या प्रतिसादातून दिसले.
राज्यात भाजपचे सरकार असल्याने इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले तर, विकासकामे रखडणार आहेत. विकास करायचा तर भाजपलाच मतदान करावे लागणार आहे. हाच मुद्दा या सभेत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला. दुसरीकडे विरोधकांनी केवळ विरोध म्हणून भरलेले उमेदवारी फार्म सामान्यांना आवडलेले नसल्याचे दिसले. त्यामुळे राहुरी विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही निवडणूक विक्रमी ठरेल, असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.





