
नेवासा तालुक्यातील आदर्शगाव म्हटल्या जाणाऱ्या सौदाळा येथे मंगळवारी एक आगळा-वेगळा उपक्रम पार पडला. काही महिन्यांपूर्वी याच गावाने जातमुक्त गाव झाल्याचे जाहीर केले होते. आता तेथील सरपंच शरद आरगडे यांनी, मंगळवारी स्वतःचा दहावा घालून एक नवा आदर्श घालून दिला. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी हा सामाजिक उपक्रम राबविला गेल्याचे त्यांनी सांगितले. तेथील स्मशानभूमीत त्यांच्या पत्नीने व मुलाने त्याचा हा विधी पार पाडला. ही बातमी नगर जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलीय.
नेवासा तालुक्याच्या पूर्वेला असणारे सौंदाळा हे गाव कायमच समाजहिताचे, प्रगत आणि प्रेरणादायी निर्णय घेणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात याआधी शिवीगाळ बंदी, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना, तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या फेब्रुवारीत याच गावाने एक ऐतिहासिक पाऊल टाकत जातमुक्त गाव होण्याचा ठराव एकमुखी मंजूर केला.
फेब्रुवारीत झालेल्या ग्रामसभेत सरपंच शरद आरगडे यांनी जात हद्दपार करण्याचा ठराव मांडला. त्यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी कोणताही विरोध न करता या ठरावाला एकमुखी पाठींबा दिला. या निर्णयामुळे सौंदाळा हे गाव थेट देशभर चर्चेत आले. या ठरावानुसार या गावात यापुढे जात, धर्म, पंथ, किंवा वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असा ठरवले गेले. या संपूर्ण गावाने माझी जात-माणूस या वाक्याला एकमुखी पाठींबा दिला.
सोशल मिडिया व अन्य माध्यमांद्वारे जातीय द्वेष पेरला जात असताना सौदाळा गावातील या ग्रामसभेची राज्यभर चर्चा झाली. आता गावातील सार्वजनीक ठिकाणे, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय योजना, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम, विवाह तसेच सण-उत्सवात कोणत्याही प्रकारचा जातीभेद केला जाणार नाही, असं ठरलं. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. गावातील प्रत्येक नागरिकाला समान वागणूक देणारं हे देशातील पहिलं गाव ठरलं. जो कोणी जातीभेद करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आता याच गावाने, गेल्या मंगळवारी म्हणजेच 21 एप्रिलला आणखी एक नवा उपक्रम राबवत एक पाऊल पुढे टाकले.
गावचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी स्वतःचा जिवंतपणी दहावा घातला. भेंडा येथील स्मशानभुमीत हा विधी पार पडला. सरपंच शरद आरगडे यांच्या पत्नी प्रियंका व मुलगा संग्राम यांनी पती- वडिलांचा पारंपारिक दशक्रिया विधी व पिंडदान विधी पूर्ण केला. श्रीगोंदा येथील सत्यशोधक विधीकर्ते भीमराव कोथिंबिरे व उत्तरेश्वर मोहोळकर यांनी हा विधी केला. या कार्यक्रमाची जेवढी चर्चा झाली त्यापेक्षा जास्त चर्चा कावळ्याची झाली. पिंडदान केल्याव अवघ्या काही सेकंदात सरपंचाच्या पिंडाला कावळाही शिवला.
हा सगळा प्रकार पाहून गावकरीही आचंबित झाले. दहाव्याच्या ताटाकडे कावळा हा फक्त भुकेपोटी येतो. त्याचा मृत व्यक्तीच्या आत्म्याशी काहीही संबंध नसतो, हेच सरपंच शरद आरगडे यांना दाखवून द्यायचे होते. झालेही अगदी तसेच. पिंडदान केल्यावर अगदी काही सेकंदात आकाशातून घिरट्या घेत कावळा आला आणि त्याने पिंडाला स्पर्श केला व पिंडही उचलून नेले.
या कार्यक्रमाबाबत माहिती देताना सरपंच शरद आरगडे म्हणाले की, “आई-वडील मुलांच्या सुखासाठी आयुष्य घालवतात, तर त्यांचाच पितृदोष मुलांना कसा लागू शकतो? मृत्यूनंतरच्या कर्मकांडांबाबत समाजात जागृती करणे, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी व मानवतावादी विचार रुजवणे, तसेच माणसाचा सन्मान जिवंतपणीच व्हावा, हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविला.”
या उपक्रमानिमित्त ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचे प्रबोधनपर प्रवचन झाले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते अविनाश पाटील, कॉम्रेड बाबा आरगडे, शशिकांत गायकवाड आणि सरपंच भाऊसाहेब सावंत यांनीही विज्ञाननिष्ठ विचार मांडत समाजप्रबोधन केले. जिवंतपणी दहावा घालण्याच्या या उपक्रमाची चांगलीच चर्चा झाली. सरपंच आरगडे यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात त्यांचे कुटुंबही तेवढ्याच आनंदाने सहभागी झाले. खरं तर, हा उपक्रम कोणत्याही कुटुंबासाठी दुःखाचा असतो. परंतु सरपंच आरगडे यांच्या पत्नी व मुलाने, समाजप्रबोधनासाठी आपल्या व गावाच्या कुटुंबप्रमुखाच्या निर्णयाला ठामपणे पाठींबा दिला. कुटुंबाचा हा उत्साहही चर्चेचा विषय ठरला.





