
जिल्ह्यात ३९ अंशांपर्यंत पोहोचणारा तापमानाचा पारा नागरिकांना भाजून काढत आहे, तर रात्रीही २६ अंशांपर्यंत घसरत नसल्याने उकाड्यापासून कोणतीच सुटका मिळत नाही. दिवस-रात्र सतत जाणवणाऱ्या या उष्णतेमुळे जनजीवन अस्वस्थ झाले आहे.
सोमवारी आकाश दिवसभर ढगांनी व्यापलेले होते. पावसाची शक्यता वाटत असली, तरी पावसाने मात्र पूर्णपणे दांडी मारली. उलट ढगांमुळे सूर्याची तिरीप कमी झाली असली, तरी हवेत ओलावा वाढल्याने उकाडा अधिकच चटका देणारा ठरला. घामाने अंगाची लाहीलाही होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस असेच ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. या काळात थेट सूर्यप्रकाश कमी असला, तरी आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल. त्यामुळे उकाडा आणखी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ढग विरळ झाल्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा पुन्हा झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. तो थेट ४१ ते ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मे महिन्यात उष्णतेची लाट येण्याचे संकेतही देण्यात आले असून, पुढील काही दिवस अधिकच कडक जाण्याची चिन्हे आहेत.
एकूणच, सध्या ढग असूनही दिलासा नाही आणि सूर्य बाहेर आला तर उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र अशा दुहेरी फटक्यात नागरिक सापडले आहेत





