
पुढल्या महिन्यांत निवडणुकांचा धुराळा उडेल. हा धुराळा आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीचा… विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्यात. तर विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीत होणार आहे. म्हणजे एकूण दहा जागांसाठी ही निवडणूक होईल. 10 पैकी 6 जागा या भाजपच्या वाट्याला येतील. तर शिवसेना शिंदे गटाला दोन, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एक व एक जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची गणिते मांडली जा आहेत. आता या 10 जागांपैकी पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव भाजपकडून फिक्स आहे. प्रश्न उरला तो इतर नऊ जागांचा… तर याच नऊ जागांसाठी सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसतेय. भाजपच्या पाच जागांसाठीच्या इच्छुकांच्या नावासाठी आज बुधवारी कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता ही बैठक होईल. या बैठकीत इच्छुकांच्या नावाची चर्चा होऊन त्यापैकी काही नावे ही केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविली जातील. या निवडणुकीत भाजप आपल्या जुन्या संघटनेतील कार्यकर्त्यांना संधी देईल, अशा चर्चा आहेत. आता याच चर्चांचा विचार केला तर, पुण्यातून दोन व नगरमधूनही काही नावांची चर्चा होताना दिसतेय. शिवसेना व राष्ट्रवादीच्या काही नावांनीही मार्केट खाल्लंय. आता कोणत्या इच्छुकांची चर्चा आहे आणि नगरच्या वाट्याला काही येईल का?
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान होईल. उद्यापासून म्हणजेच 23 एप्रिलपासून यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. संख्याबळाचा विचार केला तर, नूऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच, शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला दोन व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा मिळेल. एक जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याचीही शक्यता आहे. याशिवाय विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकही याच दिवशी होईल.
प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेसाठी ही निवडणूक असेल. ही पोटनिवडणूकही 12 मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता. त्यामुळे या जागेसाठी भाजपही प्रज्ञा सातव यांनाच संधी देईल, हे जवळपास फिक्स आहे. शिवाय संख्याबळ पाहता या जागेचा विजयही निश्चित आहे. आता या दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळा सदस्यांचा कोटा असणार आहे. बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेचा विचार केला तर, या महिन्यांत शिवसेनेचे उद्धव ठाकरे, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, भाजपचे गोपीचंद पडळकर, भाजपचेच रणजितसिंह मोहिते-पाटील, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे प्रवीण दटके, आणि भाजपचेच रमेश कराड यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे नऊ जागांसाठी ही निवडणूक होईल. पोटनिवडणुकीची एक जागा बघता विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होईल. हे मतदान दोनदा करावं लागेल.
रिक्त झालेल्या 9 जागांसाठी एकदा मतदान, तर प्रज्ञा सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी एकदा असं दोनदा हे मतदान होईल. दोन्ही मतदान एका दिवशी असल्याने, आमदारांना दोन वेळा मतदान करावं लागेल. 9 जागांसाठी 29 चा कोटा असणार आहे. तर एका जागेसाठी 51 टक्के मतांची मर्यादा असणार आहे. या समीकरणामुळे 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येतील असं गणित मांडलं जात आहे. महाविकास आघाडीला 1 जागा जिंकता येईल, अशी समिकरणे आहेत.
आता या नऊ जागांसाठी तब्बल दोन डझन इच्छुक प्रत्येक पक्षाकडे आहेत. पुण्यातून भाजपेच प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, वडगाव शेरीचे माजी आ. जगदीश मुळीक, रणजितसिंग निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकुरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी अशी तब्बल 12 नावं भाजपकडून चर्चेत आहेत. दुसऱ्या बाजूने विचार केला तर, नगर जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते कोपरगावचे विवेक कोल्हे यांचे नाव मात्र अजूनही चर्चेत आले नाही.
शिवाय राहुरीतून माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला असता तर, त्यांच्या नावाचीही विधान परिषदेसाठी चर्चा झाली असती. परंतु कदाचित यावेळी भाजपकडून संधी मिळणार नाही, हे समजल्यावरच त्यांचा पक्षप्रवेश लांबला असवा, अशाही चर्चा रंगल्या आहेत. भाजप आपल्या पाच नावांसाठी, बुधवारी रात्री कोअर कमिटीची बैठक घेऊन त्यातील काही नावे केंद्रीय समितीकडे पाठवविणार आहे. शिवाय भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाला यावेळी भाजपकडून संधी मिळेल, अशाही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या वाट्यालाही दोन जागा येणार आहेत. या दोन जागांमध्ये विधान परिषदेच्या उपसभापति डाँ. निलम गोऱ्हे व कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गट या दोन्ही नेत्यांना ताकद देईल का, हेही आज ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटापेक्षा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे मात्र इच्छुकांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादीला एक जागा मिळणार असली तरी, माजी आमदार सुनील टिंगरे, सुभाष जगताप, पिंपरी-चिंचवडचे नाना काटे, योगेश बहल अशी अनेक नावे चर्चेत आहेत. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यापैकी कुणाला संधी देतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
शिवसेना शिंदे गटांत जशी स्पर्धा आहे, अगदी तशीच स्पर्धा एक जागा वाट्याला येण्याची शक्यता असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडेही आहे. ठाकरे गटाकडून प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होतेय. परंतु ठाकरे गटातूनच त्यांच्या नावाला जोरदार विरोध होताना दिसतोय. सुषमा अंधारे या गेल्या काही दिवसांपासून आक्रमक होत असल्या तरी, त्यांना अद्याप आमदार होण्याची संधी मिळालेली नाही. यावेळी त्या नक्की उभ्या राहतील, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या निवडणुकीसाठी, उद्या गुरुवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यामुळे या सगळ्याच पक्षांची यादी आज किंवा उद्या फायनल होईल, असे सांगितले जात आहे. प्रत्येक पक्ष आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी देईल, अशा चर्चा आहेत.





