
आजकाल अनेक मुलींमध्ये वयाच्या 10 वर्षांपूर्वीच मासिक पाळी सुरू होत असल्याचं दिसत आहे. पूर्वी हा बदल 13 ते 14 वर्षांच्या वयात होत होता. मग अचानक इतका बदल का झाला ?
तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली हे यामागचं मोठं कारण आहे. मुलांमध्ये वाढलेलं लठ्ठपण हार्मोन्समध्ये बदल घडवतं. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे इस्ट्रोजेन हार्मोनची क्रिया वाढते आणि मुली लवकर वयात येऊ शकतात. जंक फूड, मिठाई आणि कमी शारीरिक हालचाल याचा मोठा परिणाम होत आहे.
याशिवाय, जास्त स्क्रीन टाइम, कमी झोप आणि मानसिक ताण यामुळेही हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं. काही वेळा थायरॉईड, PCOS किंवा इतर हार्मोनल आजारांमुळेही लवकर मासिक पाळी सुरू होऊ शकते.
प्लास्टिकच्या वस्तूंमधील काही रसायनेही शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे गरम पदार्थ स्टील किंवा काचेच्या भांड्यात देण्याचा सल्ला दिला जातो.
पालकांनी मुलींना पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक आधार देणं खूप महत्त्वाचं आहे. काही बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात उशीर करू नका.





