अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर सिमेवरील गोदापट्टा, सध्या वाळू तस्करांच्या धुमश्चक्रीने अशांत झालाय. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवसांत, दोन गोळीबाराच्या घटना घडल्यात. वाळू तस्कर विरोधात गावकरी, अशा वादानं मोठं रुप घेतलंय. या वादात तब्बल 15 ते 20 जणांना बेदम मारहाण झालीय. काही वाळूतस्करही गावकऱ्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी आहेत. याशिवाय जिल्ह्यातील महिला सुरक्षा, मिसिंग, खून, खुनाचा प्रयत्न, टोळीयुध्द, दरोडे, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, रस्तालूट, गावठी कट्ट्यांचा वाढता वापर, सायबर आणि आर्थिक फसवणुकीचे वाढते प्रकार, हेही शिगेला पोहोचले आहे. नवीन पोलिस अधिक्षक म्हणून नगर जिल्ह्यात रुजू झालेल्या मुम्मका सुदर्शन यांच्यासाठी हे सगळं थांबविण्याचं मोठं दिव्य आहे. हाताबाहेर गेलेल्या नगरला ते वळणावर कसे आणतात? आणि त्यांचे सुदर्शन चक्र नेमके कसे चालते? हाच विषय आज आपण पाहणार आहोत…
नगर जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आलेख गेल्या वर्षभरात पहिल्यापेक्षा जास्त उंचीवर गेला. शनिशिंगणापूरचे अँप घोटाळ्याचे प्रकरण कित्येक दिवस गाजले. परंतु खोदा पहाड निकला चुहा, अशी गत या घोटाळ्याची झाली. काही कोटींच्या घोटाळ्याच्या चर्चा असताना, पोलिसांना फक्त 60 लाखांचा गफला सापडला. शिवाय जे आरोपी अटक करण्यात आले होते, त्यांनाही आता जामीन झालाय. काही कोटींचा हा घोटाळा, आता फक्त बंद फाईलीत राहिलाय. हाच तपास समाधानकारक न झाल्याने तत्कालीन पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाल्याचे सांगितले गेले. खरं तर, या बदलीला फक्त शिंगणापूर घोटाळ्याचा तपासच कारणीभूत नव्हता. तर पोलिसांवरील ड्रग्ज तस्करीचे आरोप, गुटखा प्रकरणातील तपासातील पोलिसांचा संशयीत सहभाग, बनावट दूध प्रकरणात पोलिसांची चालढकलीची भूमिका, हेही या बदलीची इतर कारणे होती.
शिवाय गेल्या सहा महिन्यांत नगर जिल्ह्यात टोळीयुद्ध, गावठी कट्ट्यातून दहशत, गोळीबार अशी तब्बल डझनभर गंभीर प्रकार घडले होते. या सगळ्या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली. पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली. त्यामुळेच बिघडलेल्या जिल्ह्याला वठणीवर आणण्यासाठी पोलिस अधिक्षक म्हणून मुम्मका सुदर्शन यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली. सुदर्शन यांनी जबाबदारी स्विकारल्यावर पोलीस दलातील अंतर्गत राजकारण, राजकीय हस्तक्षेप, कामचुकार पोलिसांचे वाढते जाळे आणि काम करणार्या अधिकारी-अंमलदारांची होणारी उपेक्षा हे मोठे प्रश्न त्यांच्यासमोर होते. परंतु आता पहिल्या दीड-दोन महिन्यात त्यांनी जिल्ह्याचा आभ्यास करुन, पोलिसांना त्यांच्या कामाची पद्धत ठरवून दिली. सुदर्शन आल्यानंतर पहिल्याच महिन्यात पोलिस दलात सकारात्मक बदल जाणवले. परंतु म्हणावा असा सुरक्षितपणा अजूनही दिसत नाहीए.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे दबंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कामाची पद्धत ही कठोर आणि अभ्यासू मानली जाते. त्यामुळेच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते मोठे निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त आहे. परंतु जिल्ह्यातील पोलिस दलातील अंतर्गत राजकारण आणि कुरघोड्यांमुळे पोलिस दल आतून पोखरले असल्याच्या चर्चा आहेत. हे सगळं थांबविण्यासाठी पोलिसांच्या बदल्या होणं, अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात, सक्षम, प्रामाणिक आणि काम करणारी टीम उभी करणं आवश्यक आहे. गुन्हे उघडकीस आणण्याची क्षमता असलेल्या अधिकारी-अंमलदारांना पुढे आणणे, राजकीय दबावाला बळी न पडणे, स्थानिक गुन्हे शाखेला पुन्हा सक्रिय करणे आणि पोलीस दलातील अंतर्गत शिस्त मजबूत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच सुदर्शन हे करतील, अशा शक्यता आहेत.
सगळ्यात महत्त्वाची आहे, ती स्थानिक गुन्हे शाखा. या शाखेवर गेल्या काही वर्षांत गंभीर आरोप झाले. ड्रग्ज प्रकरणात एलसीबीनं पोलिस दलाचं नाक कापलं. शिवाय इतरही अनेक गुन्ह्यात सेटलमेंट केल्याचा आरोप एलसीबीवर झाला. त्यानंतर फक्त काही कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन एलसीबीचा कारभार सुरु झाला. परंतु नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे अजूनही एलसीबी म्हणावी अशी, विश्वासार्हता कमावू शकलेली नाही.
एलसीबीत सध्या आठ अधिकारी आणि तब्बल 62 अंमलदार कार्यरत आहेत. परंतु अजूनही त्यांना अपेक्षित कामगिरी दाखवता आलेली नाही. गंभीर गुन्ह्यांचे तपास या शाखेकडे असूनही गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले अपयश वरिष्ठांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. काही अधिकारी आणि अंमलदारांविरोधात गंभीर तक्रारीही झाल्याचे बोलले जात आहे. मागील आठवड्यात अधीक्षक सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेची चांगलीच झाडाझडती घेतल्याचेही समजते. त्यामुळे या शाखेत पुन्हा मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली होत आहे.
करप्टेड कर्मचाऱ्यांचा बदल्या आणि खमक्या अधिकाऱ्यांची नियुक्ती, हेच पुढच्या काही आठवड्यात पोलिस दलात दिसेल, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे. पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन हे पुढच्या महिनाभरात प्रत्येक पोलिस ठाण्यात नवे अधिकारी व कर्मचारी देतील, असे सांगितले जात आहे. मित्रांनो, पोलिसांची कामगिरी सुधारण्यासाठी नेमकं काय करायला हवं, असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा. शिवाय व्हिडीओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करुन व्हिडीओला लाईक करायला विसरु नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार…





