Explained

US Firing: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला, अगोदर बाँम्ब फेकला मग धाडधाड गोळ्या झाडल्या…

वार शनिवार, वेळ रात्री साधारणः 10 ची… ठिकाण व्हाईट हाऊस… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि सगळं मंत्रिमंडळ काँरस्पाॅन्डन्ट हाँलमध्ये डीनर करत असतं. एकीकडे इराणसोबत अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण असताना, ही डिनर पार्टी विशेष मानली जात होती. परंतु याच पार्टीत अक्रीत घडलं… डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर बाँम्ब पडले व त्यानंतर अंदाधुंद गोळीबाराचा आवाज झाला. काही सेकंदात सिक्रेट सर्व्हिस एजन्सी व कमांडो सतर्क झाले व त्यांनी थेट व्यासपिठाकडे धाव घेतली.

तातडीने डोनाल्ड ट्रम्प व इतर अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. एका संशयीताला ताब्यात घेतलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी जगभरात पसरली. अर्थात ट्रम्प यांच्यावर थेट हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. तर यापूर्वी निवडणुकीच्या प्रचार रॅलीतही त्यांच्यावर थेट गोळीबार झाला होता. त्यावेळी त्यांच्या कानाला खेटून गोळी गेली होती. आताही ते थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे.

वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ आयोजित करण्यात आला होते. या डिनरमध्ये सहसा उपस्थित नसणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी मात्र उपस्थित होते. व्यासपिठावर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या. डिनरपूर्वी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते मंचावर गेले. ते भाषण करत असतानाच, अचानक गोळीबाराचा आवाज आला. एका मोठ्या स्फोटाचाही आवाज आला. सुरक्षा यंत्रणांनी लागलीच व्यासपिठाचा ताबा घेत, ट्रम्प व इतर महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा साखळीत सुरक्षित स्थळी हलवले. हा डिनर अत्यंत प्रतिष्ठीत कार्यक्रम होता. परंतु तरीही तेथे गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेच्या वेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. सर्व वरिष्ठ नेते सुरक्षित आणि सुखरूप असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. घटनेच्या सुमारे एका तासानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर केले की, संशयित हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. हल्लेखोराची ओळख कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेला ३१ वर्षीय कोल थॉमस अशी पटली आहे. आता या कोल थाँमसने हा हल्ला का केला, याचा तपास सुरु आहे. शिवाय तोच हल्लेखोर आहे का, हेही पुढच्या काही तासांत समोर येणार आहे.

ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांची प्रशंसा केली आणि लिहिले की, त्यांनी जलद आणि धैर्याने कारवाई केली. त्यांनी असेही म्हटले की कार्यक्रम सुरूच राहावा अशी त्यांची इच्छा आहे, परंतु अंतिम निर्णय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा घेतील. अशा घटनेमुळे एवढ्या मोठ्या आणि कडक सुरक्षा असलेल्या कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरला देशाचे सर्वोच्च नेते आणि अधिकारी उपस्थित असतात, त्यामुळे कोणतीही चूक गंभीर मानली जाते. परंतु तरीही बाँम्ब हल्ला किंवा गोळीबार झाल्याने याच सुरक्षेविषयी चिंता वाढल्या आहेत.

सुरक्षारक्षकांनी तत्काळ कारवाई केल्याने एक मोठी दुर्घटना टळली. नेमकं काय झालंय आणि सुरक्षेत काही त्रुटी राहिल्या होत्या का, याचा तपासही आता सुरु झाला आहे. या कार्यक्रमात राजकीय नेतेमंडळीसोबत काही पत्रकार क्षेत्रातील व मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीही उपस्थित होत्या.

आता या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु झाली आहे. जो संशयीत ताब्यात घेतला गेलाय, त्याचा फोटोही व्हायरल झालाय. अर्धनग्न अवस्थेत सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात त्याला पालथं झोपविण्यात आलंय. परंतु या प्रकाराने संपूर्ण जगात खळबळ उडालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button