
सीलिंगची जमीन आता विकता येणार आहे … पण यासाठी किती पैसे भरावे लागतील ? राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे हजारो शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कमाल जमीन धारणा कायद्यानुसार मिळालेल्या सीलिंगच्या जमिनी आता वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करून विकता येणार आहेत. यासाठी जमिनीच्या रेडीरेकनर मूल्यानुसार ठरावीक टक्केवारीची रक्कम सरकारकडे भरावी लागणार आहे.
पूर्वी अशा जमिनींच्या विक्रीसाठी ५० टक्के रक्कम भरावी लागत होती आणि जमीन वर्ग २ मध्येच राहत होती. मात्र आता नवीन नियमांनुसार शहर भागातील शेती जमिनीसाठी ३० टक्के, बिगरशेतीसाठी २५ टक्के, तर ग्रामीण भागात शेतीसाठी २५ टक्के आणि बिगरशेतीसाठी २० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
ही जमीन मूळ लाभार्थ्याच्या नावावर किंवा शासनाची परवानगी घेऊन दुसऱ्याच्या नावावर असणे आवश्यक आहे. तसेच पूर्वी नियमभंग झालेल्या जमिनींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून अडकलेल्या सीलिंग जमिनींच्या खरेदी-विक्रीला अखेर गती मिळणार आहे.





