
तत्व सांभाळणाऱ्यांचं राजकारण आता संपत चाललंय, ही खंत व्यक्त केलीय, माजीमंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरेंनी… सहकारातून राजकारण करणाऱ्या राहुरीच्या तनपुरे कुटुंबातले ते तिसऱ्या पिढीचे सदस्य. ज्या तरुणाला आपल्या पहिल्याच विजयानंतर, थेट राज्यमंत्री हेण्याची संधी मिळाली तो हा नेता. फक्त पाच-सहा वर्षांत तो शरद पवारांना का कंटाळला? हा प्रश्न पडला. आता हेच तनपुरे, सोमवारी 20 एप्रिलला भाजपता जातील असं सांगितले जातंय. आता हा पक्षप्रवेश का आणि कशामुळे होतोय? पक्षप्रवेश खरंच होईल का? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
राहुरी पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरीत मोठी घडामोड झाली. माजीमंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरेंनी अचानक तलवार म्यान करत, माघार घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली भेट आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोनवरुन केलेल्या चर्चेनंतर तनपुरेंनी हा निर्णय घेतला.
तनपरेंच्या माघारीची तीन कारणे सांगितली गेली. त्यात त्यांच्याशी संबंधीत नागपूरच्या कारखान्याची ईडीकडून सुरु असलेली चौकशी, बंद पडलेल्या राहुरी कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांना दिलेला शब्द, आणि त्यांच्या ताब्यातील राहुरी नगरपालिकेला पुढच्या पाच वर्षांत मिळणारा संभाव्य निधी… या कारणांची चर्चा झाली. ही कारण खरीही असतील. पण त्यांच्या माघारीसाठी त्याहूनही एक मोठं कारण होतं. ते कारण कुणाच्याही लक्षात आलं नाही.
राहुरी आणि बारामती या दोन्ही निवडणुका एकत्र होणार होत्या. परंतु या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची वेगवेगळी धारणा दिसली. बारामतीत पवार यांच्याच कुटुंबातल्या सदस्याला निवडून द्यायचं म्हटल्यावर, स्वतः शरद पवार व त्यांचा पक्ष तेथील निवडणुकांतून बाहेर पडला. परंतु राहुरीसाठी मात्र आग्रही राहिला. तनपुरेंना हे पहिल्यांदा समजलं नाही. शरद पवार गट कदाचिक राहुरीतून माघार घेईल, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळेच अगदी सुरुवातीपासून प्राजक्त तनपुरे, आपण अपक्ष लढणार असं सांगून बसले. त्यांच्या या निर्णयाचे दोन फायदे झाले असते.
पहिला फायदा म्हणजे, शरद पवार गट निवडणुकीपासून लांब राहिला असता तरी भाजप विरोधी सगळं मतदान तनपरेंच्या वाट्याला आलं असतं. आणि दुसरा फायदा म्हणजे, शरद पवार गटाला नगर जिल्ह्यात जी उतरती कळा लागलीय, त्याचा फटका तनपुरेंना बसला नसता. पण शेवटच्या काही तासांत, शरद पवार गटाचा दुतोंडीपणा तनपुरेंनी अनुभवला. ज्या युवा नेत्याने पक्ष फुटूनही शरद पवारांना साथ दिली, त्याच नेत्यावर अविश्वास दाखवत शरद पवार गटाने, मुंबईतून पक्षाचे दोन एबी फार्म दिले.
शरद पवार गट दोन एबी फार्म देणार, ही बातमी तनपुरे गटाला फार्म भरण्याच्या आदल्या दिवशीच म्हणजेच 5 एप्रिललाच कळाली. त्यामुळे ते जास्त अस्वस्थ झाले. जर आपल्या नेत्याचाच आपल्यावर विश्वास नसेल तर, त्या पक्षात राहून फायदा काय? अशी दोलायमान स्थिती तनपुरेंच्या कार्यकर्त्यांची झाली. तनपुरे अपक्ष लढले असते आणि विजयी झाले असते किंवा पडले असते तरी त्यांचा ओढा शरद पवार गटाकडेच राहिला असता. पण, शरद पवार पक्षाने फार्म भरण्यापूर्वी थेट दोघांच्या नावाचे एबी फार्म काढल्यामुळे तनपरे मनातून खचले असावेत, असं म्हणता येतं.
आता हे आम्ही का म्हणतोय, तर शनिवारी स्वतः प्राजक्त तनपुरेंनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तनपुरे म्हणाले की, माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले. तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालं. मात्र, आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दुःख होतंय. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता. पण मला निष्ठा, तत्व याच्याशी प्रामाणिक राहावं असं वाटलं. पण सध्याचे राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला त्याचं राजकारण संपतंय. उलट जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे,”
तनपुरेंचा शरद पवार व त्यांच्या गटावर राग आहे का, हा प्रश्न पुढे आला. जिथं तत्व व निष्ठा पाळली, तिथंच अविश्वास दाखवला गेला, असं कदाचित तनपुरेंना म्हणायचं होतं का, हाही प्रश्न विचारला जाऊ लागलाय. आता सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरीत प्रचारसभा आहे. त्यापूर्वीच प्राजक्त तनपुरे हे कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. कदाचित तनुपरे हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थेट भाजपमध्ये प्रवेश करतील किंवा सध्या वेट अँण्ड वाँचची भूमिका घेऊन, अक्षय कर्डिलेंना बाहेरून पाठींबा देतील. परंतु यातही पहिली शक्यता जास्त आहे. थेट भाजपमध्ये प्रवेश केला तर, कदाचित दुसऱ्या एखाद्या प्रकारे भाजप त्यांचं पुनर्वसन करेल.
विधान परिषद किंवा 2029 ची लोकसभा निवडणूक, अशा दोन ठिकाणी त्यांची वर्णी लागू शकते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आणि स्वतः भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील या सगळ्या नेत्यांनी यापूर्वी त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. डाँ. सुजय विखे पाटील यांनी तर तीन-तीन दादा एकत्र दिसतील, असंही बोलून दाखवलंय. त्यामुळे तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता जोर आलाय. उद्या या चर्चांना नक्कीच पूर्णविराम मिळेल, अशा शक्यता व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.





