
गुरुवारी पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली. दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा चा संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अमीर हमजा या क्रुर दहशतवाद्यावर हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात अमीर हमजा गंभीररित्या जखमी झाला. सध्या त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येतेय. ज्या हमजाने कधीकाळी भारताच्याही नाकात दम आणला होता, त्याच हमजाला थेट पाकिस्तानात संपविण्याचा प्रयत्न झाला.
ही बातमी भारतीयांसाठी आनंदाचीच होती. जो पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी समजला जातो, त्याच पाकिस्तानला शरणार्थी दहशतवाद्यांनाही संरक्षण देता येत नाही, हे आता समोर आलंय. भारताचा कट्टर शत्रू व जागतिक दहशतवादी असलेला अमीर हमजावर नेमका कुणी हल्ला केला आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय?
2005 मध्ये बेंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात, तेथील एका प्राध्यापकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले होते. हा हल्ला केला होता, अमीर हमजाने. होय, ज्या अमीर हमजावर गुरुवारी पाकिस्तानमध्ये हल्ला झाला, तोच हा हमजा… हमजा हा भारताचा कट्टर शत्रू त्यापूर्वीही होता. 2005 ते 2012 पर्यंत या हमजाने, भारतातील अनेक दहशतवादी कारवायांना अंजाम दिला होता. ऑगस्ट 2012 मध्ये अमेरिकेनंही त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं.
हमजा हा मुळचा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील रहिवाशी आहे. त्यानंच हाफिज सईदच्या सोबतीनं, लष्कर-ए- तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. अफगान मुजाहिदीन या संघटनेचा तो जुना सैनिक आहे. लष्कर ए तैयबाचा मुख्य विचारवंच म्हणून तो कुप्रसिद्ध होता. आपल्या प्रक्षोभक भाषणांमुळे व प्रक्षोभक लिखाणामुळे तो जगातील अनेक देशांमध्ये कुख्यात अतिरेकी म्हणून ओळखला जात होता. हमजा म्हणजे, तरुणांचं ब्रेन वाँश करुन त्यांना अतिरेकी प्रशिक्षण देणारी चालती फिरती फॅक्टरीच होती.
2005 साली बेंगलुरुमधली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर याच हमजाने व त्याचा साथीदार असलेल्या अबू सैफुल्लाने हल्ला केला होता. 2025 मध्ये अबू सैफुल्ला यालाही पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी काही अज्ञातांनी भर रस्त्यावर ठोकले. काही अज्ञातांच्या हल्ल्यात सैफुल्ला जागीच ठार झाला. आता हमजावरही हल्ला झाला. हमजावर गुरुवारी झालेला दुसरा हल्ला होता. यापूर्वी गेल्या वर्षी जेव्हा सैफुल्लाला खल्लास करण्यात आले त्यानंतर हमजावरही हल्ला झाला होता. मे 2025 मध्ये झालेल्या त्या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला होता. लाहोरमधील त्याच्या घरी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या कमरेवर गोळ्या झाडल्या होत्या.
त्यानंतर त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार झाले होते. आता गुरुवारी पुन्हा त्याच्यावर बेछूट गोळीबार झाला. हमजा हा लष्करचा केंद्रीय सल्लागार समितीचा सदस्यही आहे. हाफिज सईदच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या विविध ट्रस्ट व धर्मादाय संस्थाचे काम तो पाहत होता. दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करणे, लष्करच्या मोहिमा राबवविणे, भारतात हल्ले करणे अशी कामे तो करत होता.
हाच हमजा जेव्हा पाकिस्तानला डोईजड झाला तेव्हा 2018 मध्ये त्याच्या जमात-उल-दावा या संघटनेवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर हमजाने जयेश-ए- मनकाफा नावाची संघटना स्थापन केली. जयेश-ए-मनकाफा ही संघटना सध्या काश्मिरमध्ये सक्रीय होती. निधी गोळा करुन भारतातील दहशतवादी कारवाया करणे, हे या संघटनेचे सध्याचे काम होते. भारतालाही तो हवा होता. गुरुवारी लाहोरमधील पिंडी स्टाॅपजवळ दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.
एका स्थानिक टिव्ही चॅनलला मुलाखत देऊन हमजा त्याच्या कारने घरी चालला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या कारवर बेछूट गोळीबार केला. हमजासोबत या कारमध्ये पाकिस्तानचे न्यायाधिश नझीर अहमद गाझी हे देखील होते. हे दोघेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील काही बातम्यांचा संदर्भ घेतला, तर हमजा या हल्ल्यात ठार झालाय. परंतु पाकिस्तानने याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
गेल्या चार वर्षांत पाकिस्तानाच आश्रयास असलेल्या अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जे-जे अतिरेकी भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी होते, त्यातील अनेकजण संपविण्यात आले आहेत. आता भारताच्या या शत्रूंना कोण संपवतंय? हा प्रश्न अनेकांना पडलाय. भारताच्या शत्रूंना संपविणारी एक अज्ञात साखळी पाकिस्तानात कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या धुरंधर या चित्रपटातही याच साखळीचा उल्लेख केलेला होता. आता हमजावर हल्ला झाल्यानंतर या चित्रपटात दाखविलेली साखळी अजूनही पाकिस्तानाच अॅक्टीव्ह आहे का, या चर्चा सुरु झाल्यात. मार्च 2022 मध्ये कंधार विमा हायजँक प्रकरणातील आरोपी झहूर मिस्त्री याची कराचीत हत्या झाली. त्यानंतर मे 2023 मध्ये खलिस्तानी दहशतवादी परमजींत सिंग पंजवड यालाही लाहोरमध्ये संपविण्यात आले.
2024 मध्ये युनायटेड जिहाद कौन्सिलचा म्होरक्या शेख जमील-उर-रहेमान याचा खून झाला. मार्च 2025 मध्ये दहशतवादी हाफिज सईदचा पुतण्या लष्कर कमांडर अबू कतल याची हत्या झाली. मार्च 2026 मध्ये जैश ए मोहम्मद चा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ मोहम्मद ताहीर अन्वर याचीही हत्या झाली. याशिवाय झियाऊर रहमान, राजौरी हल्लाचा सूत्रधार अबू कासिम काश्मिरी, हिजाबूलचा बशीर अहमद पीर यांचाही एकेक करुन खात्मा करण्यात आलाय. भारताविरोधात जो कोणी समोर येतोय, तो पाकिस्तानमध्येच संपवला जातोय. मग हे सगळं कोण करतंय…? भारताच्या शत्रूंना थेट पाकिस्तानमध्ये एकेक करुन कोण संपवतंय? हीच तर खरी गंमत आहे.





