
गुगलवर दत्तधाम सरकार असं नाव टाकलं की, समोर येतात एक महाराज. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे हा आश्रम आहे. श्री दत्तगुरुंची सेवा करुन येथे अनेक रुग्णांचे आजार बरे होत असल्याचा दावा केला जातोय. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मिडिया साईटवर दत्तधाम आश्रम असं सर्च केलं तरी, शेकडो व्हिडीओ दिसतात. आता हा धार्मिक पसारा कोण चालवतंय? तर राजेंद्र गडगे. म्हणजेच, वडगाव पानचे दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्राचे चालक गडगे महाराज.
काही त्यांच्याच व्हिडीओचा आधार घेतला तर, ते गेल्या 30-40 वर्षांपासून दत्तगुरुंची सेवा करतात, असा दावा त्यांनीच केलाय. आता नाशिकचे खरात प्रकरण उजेडात आल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यभरातील असे दरबार, महाराज, बाबा, यांच्याविरोधात नव्याने आवाज उठविण्याचा प्रयत्न केलाय. या आठवड्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक होत या गडगे महाराजांची प्रशासनाकडे तक्रार केलीय. त्यामुळे हे महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे गडगे महाराजांचा आश्रम आहे. गेल्या 38 वर्षांपासून ते हा आश्रम चालवतात. याच आश्रमात रोज होणाऱ्या पूजा-विधी किंवा दरबाराचे, दत्तधाम सरकार या सोशल मिडिया अकाऊंटवर व्हिडीओ प्रसारीत होतात. सोशल मीडियातूनच या आश्रमाची राज्यभरातील भाविकांना ओळख झाली. या व्हिडीओत काही भक्तमंडळी आपले अनुभवही सांगतात. वेगवेगळे आजार, कौटुंबिक अडचणी, व्यसनमुक्ती यासोबतच काही पितृदोष, वास्तूदोष किंवा अन्य दोषांचे निराकरण झाल्याचा अनुभव हे भक्तमंडळी अगदी कॅमेऱ्यासमोरही सांगतात. दवा आणि दुवा यांच्या आधारे हे सगळे दोष नाहीसे होत असल्याचा दावा या आश्रमाकडून व स्वतः गडगे महाराजांकडून केला जातो.
काही दिवसांपूर्वी याच महाराजांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडीओत गडगे महाराज एका भक्ताची कॅन्सरची गाठ वितळविल्याचा दावा करताना दिसतात. याच व्हिडीओवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला. त्यानंतर अनिस आक्रमक झाल्यावर हे महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले. दरबार भरवून भक्तांच्या समस्या सोडवणे, तसंच दैवी शक्तीद्वारे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर करण्याचे दावे करणे, हा गुन्हा असल्याचं अंनिसचं म्हणणं आहे.
महाराजांच्या या दाव्यामुळेच येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या 38 वर्षांपासून ते आपल्या वडिलोपार्जित जागेत दरबार भरवत असल्याची माहिती आहे. घरगुती तंट्यांपासून ते कॅन्सरच्या गाठीपर्यंत विविध आजारांवर येथे उपाय केले जातात. अशा चर्चांमुळं अनेकजण येथे येत असल्याचं सांगितलं जातंय. दररोज मोठ्या संख्येने लोक येथे येऊन नोंदणी करत असल्याचंही समोर आलं आहे. ध्यान-साधना आणि वैदिक पद्धतींच्या माध्यमातून आजार बरे करण्याचा दावा येथे केला जातोय. याच दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतलाय.
महाराजांच्या या दाव्यांमागे भोंदूगिरी आणि आर्थिक शोषण दडले असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला. या प्रकरणात तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी आणि संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडं तक्रार दाखल केली. अंनिसच्या राज्य सरचिटणीस रंजना गवांदे यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अंनिसने हे प्रकरण त्वेषानं हाताळल्याने राज्यभर त्याची चर्चा झाली.
अशा प्रकारच्या प्रकरणात मानसिक, आर्थिक आणि काहीवेळा लैंगिक शोषणाच्या घटनाही यापूर्वी समोर आल्या आहेत. नाशिकचे अशोक खरात प्रकरण किंवा रवींद्र एरंडे प्रकरण ही त्यापैकीच काही उदाहरणे होती. अलीकडील घडामोडींमुळं पुन्हा एकदा बुवाबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. सगळ्याच न्यूज चॅनल्स व वृत्तपत्रांमध्ये या प्रकरणाच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी स्वतः महाराजांनी पत्रकार परिषद घेत, लाईव्ह कॅमेऱ्यासमोर त्यांच्यावरील सगळे आरोप खोडून काढले.
आपण कोणतीही भोंदूगिरी करत नसून, सर्व आरोप निराधार असल्याचं गडगे महाराजांनी म्हटलंय. तसंच कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येथे कोणत्याही प्रकारचे पैसे भक्तांकडून आकारले जात नाहीत. फक्त पूजा विधी करण्याचा खर्च भक्तांकडून घेतला जातो, अशीही माहिती त्यांनी दिली. आपण फक्त निमित्त मात्र असून सगळे कार्य स्वतः दत्तप्रभू करतात, असंही त्यांचं म्हणणं आहे. आपण वयाच्या 13 व्या वर्षांपासून ध्यानधारणा केलीय. आपल्या पूर्वापार वडीलोपार्जीत जागेतच असणारं दत्तप्रभूंचं मंदीर आपण भव्य दिव्य केलंय. येथेच आपल्याला साक्षात्कार किंवा दत्तकृपा झाल्याचंही त्यांच्या काही व्हिडीओत त्यांनी सागितलंय. महाराजांच्या या भूमिकेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती जास्त आक्रमक झाली. आपल्या मागण्यांवर ठाम राहात या समितीने थेट प्रशासनाला निवेदन दिलंय.
आता प्रशासन या निवेदनावर काय कारवाई करतं, हे लवकरच कळेल. परंतु या प्रकरणामुळे राज्यातील भोंदूगिरी किंवा दरबार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा नेमकी कुठं आखायची, हा प्रश्न यामुळे चर्चेत आलाय.





