आपण नेहमी मंदिरात गेल्यानंतर गर्भगृहाभोवती पूर्ण प्रदक्षिणा मारतो… पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक असं मंदिर आहे, ज्या मंदीराचा प्रदक्षिणा मार्ग गेल्या १५०० वर्षांपासून अर्धवट आणि अपूर्ण अवस्थेत आहे! तो ना पूर्ण झाला, ना कुणी पूर्ण करण्याची हिंम्मत केलीय… होय, आपण बोलतोय, टाकळी ढोकेश्वरच्या गुफा मंदिराबाबत..! इतिहास सांगतो की, हे मंदिर माणसांनी कोरलं… पण याच मंदीराबाबत अनेक लोककथा सांगितल्या जातात.
या मंदीराच्या निर्मितीबाबत एका चमत्काराची अशी गोष्ट आहे, जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. आम्ही आज टाकळी ढोकेश्वरच्या ढोकेश्वर मंदीराबाबतची एक अशी कथा सांगणार आहोत, जी तुमच्यासाठी नक्कीच नवी असेल… ही कथा आहे, अवेळी आरवलेल्या कोंबड्याची… ज्यामुळं पांडवांना हा प्रदक्षिणा मार्ग अर्धवट सोडून पळावं लागलं. तर चला आपण या गुहेच्या पाषाणात दडलेलं तेच सर्वात मोठं रहस्य आज समजून घेऊयात…
नगर-पुणे जिल्ह्याच्या सिमारेषेवर असलेल्या पारनेर तालुक्याला ऐतिहासीक वारसा लाभलाय. सेनापती बापट, अण्णा हजारे हे याच तालुक्याचे… हा तालुका जसा ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा आहे, तसा तो धार्मिक बाबतीतही मागे नाही. पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर गावाच्या ईशान्येस तीन किलोमिटर अंतरावर प्राचीन व पुरातन ढोकेश्वर महादेवाचं मंदीर आहे. नुकत्याच तिसऱ्या श्रावणी सोमवारी, येथे भव्य यात्रा पार पडली. एका डोंगराच्या छातीत हे भव्य गुफा मंदिर कोरलेलं आहे.
या मंदिराची रचना अतिशय गुंतागुंतीची आणि अद्भुत आहे. मुख्य सभामंडपात भव्य खांब आहेत आणि मध्यभागी एका भव्य पाषाण खंडातून कोरलेलं महादेवाचं गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या चोहोबाजूंनी फिरण्यासाठी एक अंधारा प्रदक्षिणा मार्ग कोरण्यात आला आहे. पण तुम्ही जसे या मार्गाने पुढे जाता, तसं तुम्हाला जाणवेल की, डाव्या बाजूचं काम अतिशय सुरेख आणि पूर्ण आहे, पण उजव्या बाजूला जाताच हा मार्ग अचानक थांबतो, भिंती ओबडधोबड दिसतात… जणू काही कारागिरांनी हातातील छन्नी-हातोडे अत्यंत घाईघाईत तिथेच फेकून दिले आणि ते गायब झाले..!
या अर्धवट राहिलेल्या प्रदक्षिणा मार्गात दडलीय, महाभारतातील ती थरारक रात्र..! पांडवांना जेव्हा १ वर्षाचा अज्ञातवास मिळाला, तेव्हा कौरवांचे गुप्तहेर त्यांना शोधत होते. जर पांडव सापडले असते, तर त्यांना पुन्हा १२ वर्षे जंगलात भटकावं लागलं असतं. स्वतःची ओळख लपवण्यासाठी पाचही पांडव पारनेरच्या या निर्जन आणि घनदाट जंगलात आले.
शिवभक्त असलेल्या पाचही पांडवांचा नियम होता की, महादेवाची पूजा केल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही. आता पंचाईत झाली. पांडव तर या भव्य डोंगराजवळ अज्ञातवासात आले, परंतु तिथं महादेवाची पुजा करण्यासाठी मंदीरच नव्हतं. आता करायचं काय? स्थान बदलून दुसरीकडं जाणंही शक्य नव्हतं. तेव्हा पराक्रमी भीमाच्या डोक्यात एक कल्पना आली. भीमाने या अवाढव्य डोंगराकडे पाहिलं आणि एक अशक्य संकल्प केला—
‘सूर्योदयापूर्वी, कोणीही पाहण्याच्या आत, या डोंगराचं पोट फाडून महादेवाचा भव्य दरबार तयार करायचा!’
पाचही पांडवांकडं, अद्भूत शक्ती होत्या. रात्रीच्या पहिल्या प्रहरात भीमाने आपल्या अफाट शक्तीने डोंगराच्या दगडांवर गदा व छन्नी-हातोडीनं प्रहार सुरू केले. अर्जुनाने आपल्या गांडीव धनूच्या आणि अद्भूत अस्त्रांच्या साहाय्याने पाषाणावर कोरीव काम केलं. इतर तीन पांडवांनीही त्यांना मदत केली. अवघ्या काही तासांत, मानवी हातांना ५० वर्षे लागतील असं अवाढव्य मंदिर एका रात्रीत आकारास आलं! रात्र संपत आली होती… गर्भगृहात शिवलिंग स्थापित झाले होते. आता भीमाने शिवलिंगाभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग कोरण्यास सुरुवात केली. अर्ध्याहून अधिक प्रदक्षिणा मार्ग कोरून झाला होता… आणि तेवढ्यात, काळोख्या लख्ख रात्रीत एक भ्रम निर्माण करणारी घटना घडली..! त्या घनदाट जंगलात कुठून तरी अवतरलेल्या कोंबड्याने बाग दिली.
आता कोंबड्याची बाग म्हणजे, पहाट होण्याचा संकेत… त्यामुळे भीम व इतर पांडव घाबरले. कारण जो संकल्प होता, तो एका रात्रीचाच होता. एका रात्रीत मंदीराचं काम पूर्ण करायचं, अशी प्रतिज्ञा होती. मंदीराचं काम तर झालं, पण प्रदक्षिणा मार्ग एका रात्रीत पूर्ण होऊ शकला नाही, असा पांडवांचा भ्रम झाला. पांडव घाबरले! त्यांना वाटलं सूर्य उगवला. प्रतिज्ञा अर्धवट राहिली. अज्ञातवास भंग होण्याच्या भीतीने, पाचही पांडवांनी एका सेकंदाचाही विचार न करता, प्रदक्षिणा मार्गाचं काम तिथेच अर्ध्यावर सोडलं! भीमाच्या हातातील छन्नी-हातोडा खाली पडला… आणि पांडव त्या गुहेतून एका क्षणात गायब झाले.
मित्रांनो, खरं तर ती पहाट नव्हतीच, तो फक्त एक निसर्गाचा खेळ होता. पांडव तर तिथून निघून गेले, पण त्यांच्या घाईघाईने घेतलेल्या त्या निर्णयाचा आणि पळ काढल्याचा जिवंत पुरावा म्हणजे हा ‘अर्धवट राहिलेला प्रदक्षिणा मार्ग’ आजही या गुहेत जसाच्या तसा पाहायला मिळतो! जर तुम्ही आज तिथे गेलात, तर हा अपूर्ण मार्ग पाहून तुम्हालाही त्या रात्रीच्या थराराची अनुभूती येईल.
मित्रांनो, विज्ञान आणि इतिहास या लोककथेला मानत नाही. पुरातत्व विभागाच्या मते, या मंदिराचा आणि पांडवांचा काहीही संबंध नाही. मुळातच, इ. स. ६ व्या- ७ व्या शतकात हे मंदीर झालंय. चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात तेव्हाच्या राजांनी ते बांधलंय, असं पुरातत्व विभाग म्हणतो. जेव्हा या मंदीराचं कोरीव काम केलं जात होते, तेव्हा अचानक झालेल्या राजकीय युद्धांमुळे किंवा निधी संपल्यामुळे कारागिरांनी हे काम अर्धवट सोडले असावं, असा अंदाज बांधला जातो. इतिहासकारांच्या मते, जेव्हा चालुक्य साम्राज्याचा अस्त होत होता आणि राष्ट्रकूट घराण्याचा उदय होत होता, तेव्हा या भागात राजकीय अस्थिरता आणि युद्धे सुरू झाली. यामुळे राजाश्रय किंवा निधी मिळणे बंद झाले असावे आणि कारागिरांनी काम अर्धवट सोडून दिले असावे.
मित्रांनो, इतिहास आणि लोककथा यांचा सहसा ताळमेळ बसत नसतो. तसंच या मंदीराच्या बाबतही म्हणता येईल. आम्ही आमच्या सगळ्या व्हिडीओचे पुरावे, सगळ्या बाजूंनी तर्कशुद्ध मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तसा प्रयत्न या व्हिडीओतही केलाय. मित्रांनो, ढोकेश्वर मंदीराचा इतिहास काहीही सांगो, पण पारनेरच्या मातीत या मंदीरानं जी कथा जिवंत ठेवली आहे, ती नाकारता येत नाही. एका रात्रीत कोरलेला हा डोंगर आणि तो अर्धवट प्रदक्षिणा मार्ग आजही श्रद्धा आणि रहस्याचा एक अनोखा मेळ आहे.





