Latest

गणेशोत्सव समाजप्रबोधनाचे माध्यम बनावे : आमदार अमोल खताळ

डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या; व्यसनमुक्त आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन

आज समाजामध्ये व्यसन आणि नशेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. व्यसनमुक्त आणि नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालय व निवासस्थानी आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते लाडक्या गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे. सण-उत्सव काही मर्यादा पाळूनच साजरे करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी गणेश मंडळांचे कार्यकर्ते, राज्यकर्ते आणि प्रशासन या सर्वांची आहे. उत्सवाचा आनंद घेत असताना सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.

डीजेवर बंदीबाबत अध्यादेश निघालेला आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. काही गणेश मंडळांनी डीजेला पर्याय म्हणून बँड पथके तयार केली आहेत. नियमांचे पालन करणाऱ्या अशा मंडळांना प्रशासनाने विनाकारण त्रास देऊ नये. उत्सवाचे नियम पाळणाऱ्या गणेश मंडळांना प्रशासनाने सहकार्याची भूमिका ठेवावी, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो, अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे. सर्वांना निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवन लाभावे. यंदा संगमनेर तालुक्यासह राज्यात चांगला पाऊस पडून बळीराजाच्या शेतात भरघोस पीक यावे, त्याच्या कष्टाला चांगले फळ मिळावे आणि शेतकरी सुखी व समाधानी व्हावा. समाजातील सर्व घटकांनी मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने, गुण्यागोविंदाने नांदावे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा अधिक दृढ व्हावा, हीच गणरायाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना आहे.– अमोल खताळ, आमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button