
माती वाहतुकीचा हप्ता दिला नाही म्हणून तिघा भावांवर तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.
बेलवंडी ते चिंचळा रस्त्यावरील पिसोरे शिवारात गुरुवारी रात्री ही घटना घडली. निखिल हिरवे, नितीन हिरवे आणि त्यांचा चुलतभाऊ अभिजित हिरवे हे तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिर्यादीनुसार, नितीन हिरवे कारमधून घरी जात असताना आरोपींनी वाहन अडवले आणि ‘हप्ता का देत नाही?’ असा सवाल करत मारहाण सुरू केली.
मदतीसाठी फोन केल्यानंतर निखिल आणि अभिजित घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तिघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी १९ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून नितीन पवार याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी इतर आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
दरम्यान, सर्व आरोपींना दोन दिवसांत अटक न झाल्यास बेलवंडी बंद ठेवण्याचा इशारा ज्ञानदेव हिरवे यांनी दिला आहे.





