Latest

धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप, पुढे जे घडलं ते थरारक; राहुरीमध्ये बिबट्याचा हल्ला !

अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केंद्राळ खुर्द परिसरात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास धावत्या दुचाकीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव विजय आढाव यांच्या डाव्या पायाला नख्यांनी जखम झाली. त्यांच्यासोबत डॉ. संदीप गुंजाळ हेही दुचाकीवर होते.

उसाच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घेतल्याने दोघांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
डॉ. गुंजाळ यांनी जखमी डॉ. आढाव यांना तातडीने टाकळीमिया येथील दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

केंद्राळसह मांजरी, वळण, पाथरे, मानोरी आणि आरडगाव परिसरात बिबट्यांकडून नागरिक व पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही दुचाकीस्वारांवर हल्ल्याचे प्रयत्न झाले होते. घटनेची माहिती मिळताच अनिल आढाव यांनी वनविभागाला कळवले असून, वनरक्षक आर.सी. आरगडे यांनी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button