
शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरील खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी दूध वाहतूक करणाऱ्या चालकाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
तान्हाजी भास्कर बोराडे, वय ४०, हे माळेवाडी येथील दूध डेअरीच्या पिकअपवर चालक म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे दूध वितरण करून ते परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना रस्त्यात अडवले.
सुरुवातीला किरकोळ कारणावरून वाद घातल्यानंतर संशयितांनी अचानक बोराडे यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यांना काही समजण्याच्या आतच डोक्यावर कोयत्याने गंभीर वार करण्यात आले.
रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या बोराडे यांना नागरिक आणि पोलिसांनी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर तिन्ही संशयित जामखेडच्या दिशेने पसार झाले.
पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृताचे भाऊ सुनील बोराडे यांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





