
Bhanudas Kotkar : अहिल्यानगरच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते भानुदास एकनाथ कोतकर यांचे निधन झाल्याने शहराच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. केडगावशी त्यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर तेथील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
केडगावचा सर्वांगीण विकास व्हावा, परिसरातील नागरिकांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आणि शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पुण्यातील कोथरूडच्या धर्तीवर केडगावचा विकास करण्याची त्यांची संकल्पना होती. राजकारणाबरोबरच शिक्षण, रोजगार, कृषी आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कार्यात कोतकर कुटुंबीयांनी पुढाकार घेतला.
राजकीय प्रवासात विविध पदांवर काम करताना त्यांनी स्थानिक प्रश्नांना महत्त्व दिले. केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, नगर तालुका पंचायत समितीचे सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठीही त्यांनी प्रयत्न केले. संघर्षाच्या काळातही केडगावकरांशी असलेले ऋणानुबंध त्यांनी जपले. सर्वसामान्य नागरिकांशी असलेला संपर्क आणि परिसराच्या विकासाबाबतची तळमळ ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. भानुदास कोतकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह केडगावमधील नागरिकांमध्ये शोक व्यक्त होत असून, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
ते स्वप्न अधुरेच राहीले
केडगावचा विकास पुण्यातील कोथरूडच्या धर्तीवर व्हावा, येथील नागरिकांना चांगले रस्ते, मुबलक पाणी, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, हे स्वप्न उराशी बाळगून आयुष्यभर धडपड करणारे ज्येष्ठ नेते भानुदास एकनाथ कोतकर आज काळाच्या पडद्याआड गेले. केडगावशी त्यांचं नातं केवळ राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसराशी त्यांची भावनिक नाळ जोडलेली होती. त्यामुळेच ‘केडगाव हा माझ्या आत्म्याचाच भाग आहे’, असं ते नेहमी सांगायचे. मात्र, ज्या केडगावच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या, ज्या स्वप्नासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, ते केडगावचं कोथरूड करण्याचं स्वप्न त्यांच्या निधनाने अधुरंच राहिलं आहे.
केडगावच्या विकासासाठी आयुष्यभर धडपड
पुण्यातील कोथरूड उपनगराचा ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास झाला, त्याच धर्तीवर केडगावचाही कायापालट व्हावा, अशी भानुदास कोतकर यांची इच्छा होती. केडगावमध्ये उत्तम रस्ते, नियमित पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी विकासाचे नियोजनही केले होते. केडगाव हे केवळ शहरालगतचं उपनगर न राहता सर्व सुविधांनी परिपूर्ण परिसर म्हणून ओळखलं जावं, हा त्यामागचा उद्देश होता.
केडगावच्या विकासासाठी कोतकर कुटुंबीयांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. संदीप कोतकर महापालिकेचे महापौर असताना त्यांच्या माध्यमातून केडगावसह अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. विशेषतः केडगावकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणीप्रश्न सोडविण्यासाठी संदीप कोतकर यांनी पुढाकार घेतला. या प्रयत्नांमागे भानुदास कोतकर यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन महत्त्वाचे होते.
६० कोटींची पाणी योजना आणली, तरीही पाण्यासाठी प्रतीक्षा कायम
केडगावमधील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर व्हावी, यासाठी भानुदास कोतकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणण्यासाठी प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे २०४० सालापर्यंतची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन या योजनेचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र, पुढील काळात या योजनेकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, अशी खंत व्यक्त केली जात होती. परिणामी आजही केडगावमधील नागरिकांना तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे. एवढ्या मोठ्या योजनेनंतरही नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची बाब भानुदास कोतकर यांना अस्वस्थ करत होती. हा प्रश्न कायमचा मार्गी लागावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते.
प्रदीर्घ काळानंतर परतले, पण केडगावचे प्रश्न तसेच पाहून व्यथित झाले
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कोतकर कुटुंबीयांना नगर शहराबाहेर राहावे लागले होते. त्यामुळे भानुदास कोतकर दीर्घकाळ केडगाव आणि नगरकरांपासून दूर होते. मात्र, पुन्हा केडगावमध्ये परतल्यानंतर येथील परिस्थिती पाहून त्यांना वेदना झाल्या.
वर्षानुवर्षे उलटूनही पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आणि शिक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न पूर्णपणे सुटलेले नव्हते. केडगावचा महापालिकेत समावेश होऊनही नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याची खंत त्यांना होती.
सन २००३ मध्ये केडगावचा महापालिकेत समावेश झाला. त्यानंतर नागरिकांवरील करांचा बोजा वाढला. मात्र, त्या तुलनेत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, याबाबत कोतकर वारंवार नाराजी व्यक्त करत असत. केडगावच्या विकासाला पुन्हा गती देण्याचा त्यांचा निर्धार होता. महापालिका निवडणुकीच्या काळातही ‘आम्ही एखादी गोष्ट ठरवली, तर ती नक्की करून दाखवतो’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
सर्वसामान्यांशी जपलेलं नातं हीच खरी ताकद
भानुदास कोतकर यांनी राजकारणाबरोबरच व्यवसायातही आपलं स्थान निर्माण केलं. मात्र, आपल्या यशाचं श्रेय ते नेहमी सर्वसामान्य जनतेशी असलेल्या ऋणानुबंधांना देत असत. केडगावकरांनी दाखवलेला विश्वास आणि कठीण काळात दिलेली साथ ते कधीही विसरले नाहीत. कोतकर कुटुंबीयांच्या संघर्षाच्या काळातही केडगावमधील अनेक नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच केडगावशी असलेलं त्यांचं नातं अधिक घट्ट झालं होतं. या परिसराचा विकास करणे, हे ते आपलं कर्तव्य मानत होते.
गरीब कुटुंबांतील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून उभारल्या शाळा
राजकारण आणि समाजकारणाबरोबरच भानुदास कोतकर यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षण क्षेत्रातील योगदान. सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं, या उद्देशाने भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय दूर करण्यासाठी सुरुवातीला भैरवनाथ पठार येथे विद्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर केडगावमध्ये भाग्योदय माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेता यावे, यासाठी उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
लहान मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी केडगावमध्ये प्राथमिक शाळा आणि जगदंबा विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या शैक्षणिक संस्थांमुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली.कोतकर कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या शिक्षणकार्याचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांना झाला. शिक्षणाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांतील मुलांनाही स्वतःचं भविष्य घडवण्याची संधी मिळावी, ही त्यामागची भावना होती.
शेकडो युवकांना रोजगाराची संधी
भानुदास कोतकर यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच युवकांच्या रोजगारासाठीही प्रयत्न केले. महापालिका आणि नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेकडो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली.सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत कोतकर कुटुंबीयांनी केलेल्या कामामागे भानुदास कोतकर यांचं मार्गदर्शन होतं. केडगावमधील अनेक कुटुंबांशी त्यांचा थेट संपर्क होता. स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख होती.
कोणताही राजकीय वारसा नसताना निर्माण केलं स्वतःचं स्थान
भानुदास कोतकर यांना राजकारणाचा कोणताही मोठा वारसा नव्हता. तरीही त्यांनी स्वकर्तृत्वावर राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, नगर तालुका पंचायत समितीचे सभापती आणि नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी विविध पदे त्यांनी भूषविली.
विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी केलेल्या कामाची वेगळी ओळख निर्माण झाली. बाजार समितीच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेप्ती उपबाजार समितीच्या उभारणीतही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. शेतकरी, व्यापारी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांसाठी सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.राजकीय प्रवासात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले, तरी त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. राजकारणाबरोबरच फलोत्पादन क्षेत्रातही ते सक्रिय होते.
केडगावचं कोथरूड कोण करणार?
भानुदास कोतकर यांच्या मनात केडगावच्या भविष्याचं एक वेगळंच चित्र होतं. पुण्यातील कोथरूडप्रमाणे विकसित रस्ते, पुरेसा पाणीपुरवठा, उत्तम शाळा, आरोग्य सुविधा आणि नागरिकांना चांगलं जीवनमान देणारं केडगाव त्यांना घडवायचं होतं.त्यासाठी त्यांनी नियोजन केलं, प्रयत्न केले आणि अनेकदा आपल्या भाषणांमधून हा संकल्प बोलूनही दाखवला. मात्र, काळाने त्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली नाही.
आज भानुदास कोतकर यांच्या निधनाने केडगावच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. त्यांच्या जाण्याने कोतकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच त्यांच्याशी अनेक वर्षे जोडलेल्या नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
ज्या केडगावला त्यांनी आपल्या आत्म्याचा भाग मानलं, त्या केडगावचा कायापालट करण्याचं त्यांचं स्वप्न मात्र अजूनही अपूर्ण आहे. आता हे स्वप्न प्रत्यक्षात कोण उतरवणार, केडगावकरांच्या मूलभूत प्रश्नांना कायमचा न्याय कधी मिळणार, हा प्रश्न त्यांच्या जाण्यानंतर अधिक ठळकपणे समोर आला आहे. भानुदास कोतकर यांची आठवण येईल, तेव्हा केडगावच्या विकासासाठी त्यांनी पाहिलेलं हे अधुरं स्वप्नही नागरिकांच्या मनात कायम राहील.





