
गल्लीत गोंधळ घालून कोणी राजा होत नसतं. तर शांत डोक्याने डाव पलटवणाराच खरा ‘सिकंदर’ असतो! अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारनेरचा गड जिंकल्यावर खासदार निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या नशेत थेट पातळी सोडून जहरी घोषणा दिल्या.
परंतु त्यावेळी त्यांचे राजकीय विरोधक असणाऱ्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी ना प्रत्युत्तर दिलं, ना त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरड केली. विरोधकांच्या या सर्व टीकेला आणि घोषणांना सुजय विखेंनी आपल्या राजकीय चाणक्यनीतीने असा काही ‘धोबीपछाड’ दिला की अख्खा जिल्हा पाहत राहिला.
थेट जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होत त्यांनी सहकाराचं हे सत्ताकेंद्र आपल्या हातात घेतलं. क्रिकेटच्या मैदानावर जसा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर गोलंदाजांच्या स्लेजिंगला तोंडाने नाही तर आपल्या बॅटने उत्तर द्यायचा, अगदी तसाच ‘मास्टरस्ट्रोक’ सुजय विखेंनी खेळला…
शब्दांनी नाही तर थेट कृतीने आणि सत्तेने उत्तर देणाऱ्या सुजय विखे पाटीलांच्या या स्टाईलमुळे नगरच्या विखे हेच राजकारणातले ‘सचिन तेंडुलकर’असल्याच्या चर्चा, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरु झाल्या आहेत.





