
प्रवाशांच्या वेशात आलेल्या तिघांनी एका कारचालकासोबत जे केलं, ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल! भाड्याने कार घेतली, पण प्रवासादरम्यान कोयत्याचा धाक दाखवत चालकाचंच अपहरण केलं आणि पुढे थेट वांबोरी परिसरात नेऊन अमानुष प्रकार केला.
पुण्यातील दिघी येथील सोपान गोविंद दंडगुले हे ऑनलाइन प्रवासी सेवेसाठी कार चालवतात. ३० सप्टेंबर रोजी ते पुण्याहून नाशिकला गेले होते. तिथून शिर्डीला जाण्यासाठी तीन प्रवाशांचं भाडं मिळालं. मात्र, शिर्डी जवळ येताच या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून कार थांबवली.
चालकाला बेदम मारहाण करून त्याचे हातपाय बांधले, डोळ्यांवर पट्टी बांधली आणि नग्न अवस्थेत मागील सीटवर टाकलं. त्यानंतर राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात पहाटे अडीचच्या सुमारास रस्त्याच्या कडेला सोडून आरोपी कार आणि मोबाईल घेऊन फरार झाले.
सकाळी कसाबसा पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या दंडगुले यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, कार आणि मोबाईल हस्तगत करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. आता या तिघांचा शोध कधी लागणार, याकडे लक्ष लागलं आहे.





