
श्रीगोंदे तालुक्यातील निमगाव खलू शिवारात वृद्ध दाम्पत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत ६७ वर्षीय मंगलबाई शिवाजी भोईटे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे ७३ वर्षीय पती शिवाजी भोईटे गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने पाच ते सहा जण घरात घुसल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी दाम्पत्याच्या मानेवर धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ६ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन आरोपी पसार झाले.
दुपारी घराचा दरवाजा बंद असल्याचे मुलाच्या लक्षात आल्यानंतर घटना उघडकीस आली. घरात पाहणी केली असता दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत आढळले.
मंगलबाई यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर शिवाजी भोईटे यांच्यावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.





