Latest

सिस्पे घोटाळा : पैशांसाठी गुंतवणूकदार महिलांनी एजंटला भररस्त्यात चोपला

“आमचे पैसे परत द्या !” — या मागणीसाठी संतप्त महिलांनी श्रीगोंद्यात सिस्पे कंपनीच्या एजंटला भररस्त्यात अडवून मारहाण केली. कोट्यवधींच्या गुंतवणूक घोटाळ्यामुळे आता नागरिकांचा संयम सुटताना दिसत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील हजारो नागरिकांनी सिस्पे कंपनीत पैसे गुंतवले होते. मात्र कंपनीचे मुख्य आरोपी नवनाथ औताडे आणि इतर संचालक गायब झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. अनेक कुटुंबांची आयुष्यभराची बचत धोक्यात आली आहे.

गुरुवारी काही महिलांनी शहरातील एका एजंटला रस्त्यात अडवून पैशांची मागणी केली. “मुख्य आरोपींकडून पैसे आले की देतो,” असे उत्तर मिळताच महिलांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी एजंटला चोप दिला.

यापूर्वीही महाराष्ट्र बँकेसमोर त्याच एजंटला मारहाण झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, एजंटने श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण मुख्य आरोपी अटकपूर्व जामीन घेऊन फरार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

हा प्रकार फक्त आर्थिक फसवणूक नाही, तर सामान्य लोकांच्या विश्वासाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button