
अहिल्यानगरकरांसाठी हवामानाबाबत एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आलीये. कडक उन्हामुळे हैराण झालेल्या जिल्ह्याला आता लवकरच पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मंडळी, हवामान अभ्यासक आणि जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी मान्सूनबाबत महत्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात 27 ते 31 मे दरम्यान मान्सूनपूर्व म्हणजेच वळवाच्या पावसाची चांगली हजेरी लागणार आहे.
सध्या तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी 26 मेपर्यंत हवेत आर्द्रता वाढण्यास सुरुवात होईल आणि वातावरण ढगाळ बनत जाईल. त्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा वळवाचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच 27 ते 31 मे दरम्यान बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाची चांगली हजेरी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
अहिल्यानगर जिल्ह्यात नियमित मान्सूनचे आगमन 7 ते 10 जून दरम्यान होईल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे 10 ते 20 जून दरम्यान जिल्ह्यात पेरणीयोग्य सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यावर्षी नैऋत्य मान्सूनची परिस्थिती खरीप हंगामासाठी अनुकूल असल्याचेही सांगण्यात आले आहे.





