
पारनेर सोसायटी मतदारसंघातून स्वतः खासदार निलेश लंके यांनी विजय मिळवला खरा… पण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मैदानात उतरलेल्या ‘परिवर्तन पॅनल’चा पार धुरळा उडाला. १० जागा लढवून परिवर्तन पॅनलला फक्त एकच जागा जिंकता आली.
निवडणुकीपूर्वी सहकारसम्राटांवर टिका करुन हवा गरम करणाऱ्या परिवर्तन पॅनलचा बार फुसका ठरला. सहकार पॅनलने लंकेंना पारनेरमध्येच अडकून ठेवण्यात यश मिळवलं. लंके इतरत्र कोठेही जास्त प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळेच लंकेंनी बाकीच्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडलं का? हा प्रश्न आता विचारला जावू लागला आहे.
स्वतःचा मतदारसंघ वाचवण्याच्या नादात इतर जागांकडे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर आरोप आता लंकेंवर होऊ लागला आहे. इतकंच नाही, तर लंकेंसोबत असलेले दिग्गज नेते माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मुलाला पराभवाचा धक्का बसलाय.
तर तिकडे राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांनाही आपल्या सुपुत्राला विजय मिळवून देता आलेला नाही. स्वतः जिंकले पण पॅनल हरला अशी स्थिती सध्या खासदारांबाबत झाली आहे. लंके पॅटर्न जिल्हा बँकेत का फेल ठरला? तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.





