
नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग बदलण्याच्या चर्चेने आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण सरळ रेल्वेमार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे आक्रमक झाले आहेत. सिन्नर-संगमनेर-अकोले-राजगुरुनगर या मार्गानेच पुणे-नाशिक रेल्वे धावली पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
याच मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्गासह विविध ठिकाणी मोठे जनआंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. अनिल काकोडकर समितीने जनसुनावणी घ्यावी आणि नागरिकांच्या भावना जाणून घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, समितीला देण्यात आलेली ६० दिवसांची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अद्याप जनसुनावणी झालेली नसल्याचा मुद्दा तांबे यांनी उपस्थित केला आहे. केवळ तांत्रिक अभ्यास नव्हे, तर जनतेचे मतही अहवालात प्रतिबिंबित झाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.
विशेष म्हणजे, सरळ रेल्वेमार्गाची मागणी मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि प्रसंगी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद करण्याचा इशाराही तांबे यांनी दिला आहे. आता समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





