
एका गावात ९ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांनी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली… आणि आता विद्यार्थ्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटलं आहे!
नेवासा तालुक्यातील सौंदळा आणि परिसरात १३ ते १८ वयोगटातील ९ शालेय विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या पार्श्वभूमीवर सौंदळा ग्रामसभेत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
सरपंच शरद आरगडे यांच्या माहितीनुसार, गावातील १० जणांना समुपदेशनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पालकांना मुलांची तुलना न करणे, गुणांचा दबाव न आणणे आणि मुलांशी संवाद वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
प्रत्येक शाळेत विश्वासू शिक्षक किंवा वर्गप्रतिनिधी नियुक्त केला जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी गोपनीय हेल्पलाईनची व्यवस्था करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
याशिवाय गावात वाचन कट्टे सुरू करून परीक्षा ताण, नैराश्य, कौटुंबिक समस्या आणि करिअरच्या चिंतांवर नियमित संवाद सत्रे घेतली जाणार आहेत. कारण मुलांना नेहमी सल्ल्यापेक्षा कधी कधी फक्त ऐकून घेणाऱ्या माणसाची गरज असते!





