
NEET पेपरफुटीनंतर एक मोठा प्रश्न समोर आलाय… शिक्षण खरंच विद्यार्थ्यांसाठी आहे, की कोचिंग क्लासेससाठी मोठा व्यवसाय बनलाय?
मंडळी, देशात NEET, JEE, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमुळे कोचिंग इंडस्ट्री प्रचंड वेगाने वाढत आहे. दिल्ली, कोटा, पुणे, नागपूरपासून आता छोट्या शहरांपर्यंत मोठमोठे क्लासेस उभे राहत आहेत.
लाखो विद्यार्थ्यांना ‘100 टक्के सिलेक्शन’ची स्वप्नं दाखवून कोट्यवधींची कमाई केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या सुमारे 1 लाख जागांसाठी तब्बल 20 ते 22 लाख विद्यार्थी स्पर्धेत उतरतात. यातील बहुतांश विद्यार्थी कोचिंगवर अवलंबून असतात.
दोन वर्षांच्या कोर्ससाठी 2 ते 3 लाख रुपये फी घेतली जाते. काही मोठ्या क्लासेसमध्ये 25 हजारांहून अधिक विद्यार्थी शिकतात आणि एका संस्थेचा वार्षिक व्यवसाय 250 कोटींपर्यंत पोहोचतो. पेपरफुटी प्रकरणामुळे या क्षेत्रातील गैरप्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत.
शिक्षणापेक्षा निकाल आणि पैशांची स्पर्धा वाढल्याने पालकांमध्ये मोठी चिंता आहे. धक्कादायक म्हणजे, कोचिंग इंडस्ट्रीकडून सरकारला मिळणारा GST महसूलही 2019 मधील 2240 कोटींवरून 2023 मध्ये 5517 कोटींवर पोहोचला आहे.





