तुम्ही कधी असा शाकाहारी पदार्थ खाल्लाय का, जो खाल्ल्यानंतर मटण, चिकन आणि मासळीची चवही फिकी पडते? असा एक पदार्थ… ज्याचा घमघमाट सुटला की रस्त्याने जाणाऱ्या खवय्यांचे पाय आपोआप खानावळीकडे वळतात. ज्याला वरून लालभडक झणझणीत तर्री असते आणि खाली अस्सल गावरान चवीची आमटी! आणि विशेष म्हणजे, इतकी तिखट असूनही ती खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोटाला अजिबात त्रास होत नाही. मंडळी, आपण बोलतोय अहिल्यानगर म्हणजेच आपल्या लाडक्या नगर जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीच्या दोन अनमोल रत्नांबद्दल — ‘शिपी आमटी’ आणि ‘शिंगोरी आमटी’!
या दोन्ही आमटी केवळ पाककृती नाहीत, तर दुष्काळी पट्ट्यातील कष्टकरी माणसांच्या कल्पकतेचा आणि समृद्ध इतिहासाचा जिवंत पुरावा आहेत. आजच्या या खास व्हिडीओमध्ये आपण या दोन्ही आमटींचा उगम, त्यांचं रंजक नामकरण, बनवण्याची अस्सल पद्धत आणि त्यामागचा रंजक इतिहास जाणून घेणार आहोत.
आपल्या महाराष्ट्रात दर ५० ते १०० किलोमीटरवर भाषा बदलते, संस्कृती बदलते आणि बदलते ती जेवणाची चव. नगर जिल्हा हा ऐतिहासिकदृष्ट्या जसा समृद्ध आहे, तसाच तो खाद्यसंस्कृतीतही वेगळा आहे. इथल्या मातीत काळ्या मसाल्याचा ठसका आणि गावरान कष्टाची चव उतरली आहे. नगर जिल्ह्यात तसं तर ‘येसूर आमटी’ किंवा ‘उंबर हंडी’ असे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत; पण दोन आमटी अशा आहेत ज्यांचं मूळ उगमस्थान फक्त आणि फक्त नगर जिल्हाच आहे. पहिली म्हणजे कर्जत-जामखेड भागातील ‘शिपी आमटी’ आणि दुसरी म्हणजे शेवगाव-पाथर्डी भागातील ‘शिंगोरी आमटी’.
चला, आधी जाऊया नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात, म्हणजेच कर्जत तालुक्यात. कर्जतला तुम्ही कधी गेलात, तर तिथे तुम्हाला अनेक खानावळींच्या बाहेर एक खास पाटी दिसेल — ‘स्पेशल शिपी आमटी’.
या आमटीचा इतिहास सुमारे १९६५ पासूनचा आहे. तो काळ असा होता जेव्हा वाहतुकीचं मुख्य साधन होतं बैलगाडी. व्यापारी आणि बाजारकरू बैलगाडीने गावोगावी फिरत असत. प्रवासात गावांशी फारसा संपर्क नसायचा. जिथे मुक्काम पडेल तिथे तीन दगडांची चूल मांडायची, जवळ असेल ती डाळ आणि मसाले एकत्र टाकून झटपट फोडणी द्यायची आणि गरमागरम आमटी तयार करायची. कर्जत आणि शेजारील करमाळा तालुक्यातील कोर्टीच्या आठवडी बाजारात ही आमटी हमखास बनवली जायची. जुने जाणकार सांगतात की, त्या काळात बाजारात ही आमटी बनवणारी व्यक्ती ही शिंपी समाजाची होती. त्यांच्या हाताला अशी काही जादू होती की त्यांच्या आमटीचा घमघमाट संपूर्ण बाजारात पसरू लागला. लोक आवर्जून ‘शिंप्याची आमटी’ खायला येऊ लागले. पुढे अपभ्रंश होऊन तिला ‘शिपी आमटी’ हे नाव पडलं, असं सांगितलं जातं.
वेळेनुसार या आमटीत अनेक सुधारणा झाल्या. अस्सल शिपी आमटी बनवताना तूर डाळ किंवा काही ठिकाणी पंचरत्न मिक्स डाळी शिजवून घेतली जाते. या आमटीचं गुपित तिच्या फोडणीत आहे. जेवढी डाळ असेल तेवढं तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडवले जातात. त्यानंतर कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट, कढीपत्ता, हिंग, धने पूड, लाल मिरची पावडर आणि नगरचा खास काळा मसाला घालून खमंग फोडणी तयार केली जाते. यात शिजवलेली डाळ, मीठ आणि चवीला किंचित साखर घालून एकच दणदणीत उकळी काढली जाते. शिपी आमटी वाढली जाते तेव्हा तिचे दोन भाग दिसतात. वर लालभडक झणझणीत तर्री आणि खाली घट्ट स्वादिष्ट आमटी. ज्यांना प्रचंड तिखट आवडतं ते तर्रीसकट खातात. ज्यांना कमी तिखट चालतं, ते वरची तर्री बाजूला काढतात; पण मूळ आमटीची चव तीच राहते.
या आमटीसोबत ताटात बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी, चपाती, भाजलेले खारे शेंगदाणे, पापड आणि सोबतीला गोड गुलाबजाम दिला जातो. तिखट आमटीचा भुरका मारत, कपाळावरचा घाम पुसत आणि मध्येच तिखटपणा कमी करण्यासाठी भाजलेले शेंगदाणे किंवा गुलाबजाम खाण्याची मजा काही औरच असते. पूर्वी फक्त मंगळवारी आणि गुरुवारी मिळणारी ही आमटी आता कर्जतमध्ये दररोज मिळते. विशेष म्हणजे पूर्वी खानावळीत फक्त आमटी मिळायची; लोक घरूनच तांब्या-वाटी, भाकरी आणि कांदा घेऊन यायचे. आज ५० ते १०० रुपयांत या आमटीचं भरगच्च ताट मिळतं. कर्जतमध्ये कुणी परीक्षा पास झालं, कुणाच्या घरी पाळणा हलला, किंवा एखादा नवीन सरकारी अधिकारी बदलून आला, तर त्याचा पहिला पाहुणचार ‘शिपी आमटी’नेच होतो. आज या आमटीचा विस्तार पुणे, मुंबई आणि राज्यभरातील महामार्गांवरील हॉटेल्सपर्यंत पोहोचला आहे.
आता कर्जतवरून आपण वळूया नगर जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकाला, म्हणजेच शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर. इथे एक छोटंसं गाव आहे — ‘शिंगोरी’. या गावाने महाराष्ट्राला अशी एक रेसिपी दिली आहे, जी ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. ती म्हणजे ‘शिंगोरी आमटी’!
आपल्याकडे आमटी म्हटलं की डोळ्यांसमोर तूर किंवा हरभरा डाळ येते. पण शिंगोरी आमटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही आमटी ‘बिना डाळीची’ बनवली जाते. यामागेही एक मोठा सामाजिक आणि भौगोलिक इतिहास आहे. शेवगाव-पाथर्डी हा भाग पूर्वी कायम दुष्काळाच्या छायेत असायचा. सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबात रोज डाळ किंवा भाज्या उपलब्ध असतीलच असं नसायचं. घरात डाळ नसताना आणि भाजीला काहीच नसताना जेवायचं काय? या प्रश्नातून शिंगोरी गावातील सुगरण महिलांच्या कल्पकतेतून या आमटीचा जन्म झाला. शेवगाव तालुक्यातील शिंगोरी गावात ही पद्धत पिढ्यानपिढ्या विकसित झाली.
विशेष म्हणजे तिथले स्थानिक लोक अभिमानाने सांगतात की, शिंगोरी गावातील पाण्याची जी चव आहे, त्या पाण्यात ही आमटी बनवली की तिला एक वेगळीच अवीट गोडी येते. या गावावरूनच या आमटीला ‘शिंगोरी आमटी’ हे नाव मिळालं आणि पुढे ती ‘नगर स्पेशल शिंगोरी आमटी’ म्हणून राज्यभर प्रसिद्ध झाली. काहींच्या मते, ही आमटी भगवानबाबांच्या नारळी सप्ताहातील पंगतीतून राज्यभर पोहोचली असंही म्हटलं जातं. डाळ न वापरता या आमटीला घट्टपणा आणि चव कशी येते? तर त्याचं रहस्य आहे गावरान वाटणात! सुके खोबरे, भाजलेले शेंगदाणे, कारळे किंवा तीळ, भरपूर लसूण, कोथिंबीर आणि नगरचा काळा मसाला एकत्र वाटून घेतलं जातं.
तेलात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हे वाटण खमंग परतून त्यात गरम पाणी ओतलं जातं. काही ठिकाणी चवीसाठी चिंचेचा कोळ किंवा टोमॅटोचा वापर होतो. ही आमटी दिसायला अतिशय तर्रीदार आणि झणझणीत असते, पण चवीला तितकीच हलकी असते. अनेकजण ही आमटी भाकरीसोबत चुरून खातात, तर काहीजण गरमागरम भातावर कालवण म्हणून घेतात. इतकंच नाही तर पावसाळ्यात किंवा थंडीत सर्दी-खोकला झाल्यावर ही आमटी सूपसारखी गरमागरम प्यायली जाते. पचायला अत्यंत हलकी असल्यामुळे आजच्या काळात डायट करणाऱ्यांसाठीही ही एक उत्तम रेसिपी मानली जाते. पूर्वी फक्त शिंगोरी आणि आसपासच्या खेड्यापाड्यांत बनणारी ही आमटी आज सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे. शेवगाव-गेवराई महामार्गावरील हॉटेल्समध्ये आजही ‘स्पेशल शिंगोरी आमटी’ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते.
तर मंडळी, शिपी आमटी ही प्रवाशांची आणि बाजाराची भूक भागवणारी, डाळींचा वापर करून बनवलेली ‘शाही गावरान मेजवानी’ आहे. तर शिंगोरी आमटी ही घरात काहीच नसताना उपलब्ध साहित्यातून, बिना डाळीची बनवलेली ‘कष्टकऱ्यांच्या कल्पकतेची मेजवानी’ आहे. दोन्ही आमटींचा आत्मा एकच आहे — नगरचा काळा मसाला, लसणाचा ठसका आणि पाहुणचाराची आपुलकी. तुम्ही नगर जिल्ह्यातले असाल किंवा कधी कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव भागात गेलात, तर या दोन्ही आमटींचा आस्वाद नक्की घ्या.





