Explained

नाट्यगृहाचं उद्घाटन झालंच नाही? तांबे- खताळ वादाचा ZP निवडणुकीवर काय परिणाम होणार?

संगमनेरच्या राजकारणात सध्या एका अशा वास्तूवरून घमासान सुरू झालं आहे, जी खरं तर कला, साहित्य आणि संस्कृतीचं प्रतीक मानली जाते. ती वास्तू म्हणजे संगमनेर नगरपरिषदेचं नूतनीकरण केलेलं अत्याधुनिक ‘कवी अनंत फंदी बंदिस्त नाट्यगृह’! एका बाजूला संगमनेरकरांसाठी १,००० आसन क्षमतेचं, तालुका पातळीवरचं राज्यातील सर्वात भव्य आणि सुसज्ज नाट्यगृह खुलं झाल्याचा आनंद साजरा केला जातोय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकांचे प्रयोगही या रंगमंचावर हाऊसफुल्ल पार पडले. पण दुसरीकडे, “या नाट्यगृहाचं अधिकृत लोकार्पण अजून झालेलंच नाही,” असं चक्क नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीच जाहीर केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं हे प्रकरण काय आहे? २३ नोव्हेंबरला नाट्यगृहात नेमकं काय घडलं? मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी अशी भूमिका का घेतली? या वादात थोरात-तांबे गट आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या गटाची बाजू काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या श्रेयवादाचा संगमनेरच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?

सध्याचा वाद समजून घेण्याआधी या नाट्यगृहाचा थोडक्यात इतिहास आणि प्रवास जाणून घेणं गरजेचं आहे. संगमनेर शहर आणि तालुक्याला शाहीर कवी अनंत फंदी यांच्यापासून ते शाहीर विठ्ठल उमप, कांताबाई सातारकर, पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यापर्यंत समृद्ध कला आणि लोककलेचा वारसा लाभला आहे. संगमनेरमधील रसिकांसाठी पूर्वी इथे ‘कवी अनंत फंदी खुलं नाट्यगृह’ अस्तित्वात होतं. मात्र, बदलत्या काळानुसार आणि हवामानाच्या मर्यादांमुळे इथे एक सुसज्ज ‘बंदिस्त नाट्यगृह’ असावं, अशी कलाप्रेमींची अनेक वर्षांची मागणी होती. या प्रकल्पाच्या कागदोपत्री आणि प्रत्यक्ष नोंदी पाहिल्यास, २० ऑक्टोबर २०११ रोजी या कामाचं भूमिपूजन झालं होतं. त्यानंतर पुढे निधीची तरतूद आणि तांत्रिक बाबींमुळे हे काम टप्प्याटप्प्याने पुढे सरकत गेलं.

साधारण चार वर्षांपूर्वी, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून हे नाट्यगृह बंदिस्त करण्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मधील एक कोनशिलाही या वास्तूवर पाहायला मिळते. अलिकडच्या काळात या नाट्यगृहाला अत्याधुनिक रूप देण्यासाठी मोठं काम हाती घेण्यात आलं. तब्बल १,००० प्रेक्षक क्षमतेचं प्रेक्षागृह, आधुनिक ध्वनी आणि प्रकाश योजना, अकॉस्टिक पॅनेल्स आणि प्रशस्त पार्किंग अशी वैशिष्ट्यं असलेलं हे नाट्यगृह उभारण्यात आलं. विशेष म्हणजे, या वास्तूच्या उभारणीत आमदार सत्यजित तांबे यांनी वेळोवेळी पाहणी करून, नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि स्वतः प्रशांत दामले यांचं मार्गदर्शन घेऊन आवश्यक ते बदल सुचवले होते. थोडक्यात सांगायचं तर, गेल्या दशकभरापासून सुरू असलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वास येऊन संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी सज्ज झाला होता.

आता आपण येऊया मुख्य वादाकडे. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, म्हणजे १९ नोव्हेंबरच्या सुमारास नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नाट्यगृहाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी या नाट्यगृहात नाट्यप्रयोगांचं आयोजन करण्यात आलं. २३ नोव्हेंबरला झालेल्या या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

या सोहळ्यात नाट्यगृहाचं लोकार्पण झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘शिकायला गेलो एक’ आणि त्यानंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांचे प्रयोग पार पडले. संगमनेरकरांनी या दोन्ही प्रयोगांना हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला. इथपर्यंत सगळं काही सुरळीत आणि उत्साहात सुरू होतं. पण खरा ट्विस्ट आला तो या कार्यक्रमानंतर!

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी एक भूमिका मांडली, ज्यामुळे संगमनेरच्या राजकारणात खळबळ उडाली. मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, “२३ नोव्हेंबरला झालेला कार्यक्रम हा नगरपरिषदेचा अधिकृत लोकार्पण सोहळा नव्हता. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाची काही कामं अद्याप बाकी आहेत. ती कामं पूर्ण झाल्यानंतर प्रोटोकॉलनुसार पालिकेच्या वतीने अधिकृत लोकार्पण सोहळा आयोजित केला जाईल.”

हाच या वादाचा केंद्रबिंदू आहे. एका बाजूला सत्ताधारी गटाकडून नाट्यगृहाचं लोकार्पण झाल्याचं सांगण्यात आलं, तर दुसऱ्या बाजूला नगरपरिषद प्रशासनच म्हणतंय की लोकार्पण अजून बाकी आहे.

मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या या भूमिकेमागे नेमकं काय कारण आहे, यावरून संगमनेरमध्ये दोन टोकाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून अमोल खताळ हे संगमनेरचे विद्यमान आमदार म्हणून निवडून आले आहेत. नियमानुसार किंवा शासकीय प्रोटोकॉलनुसार, शहरात एखाद्या शासकीय किंवा नगरपरिषदेच्या मोठ्या वास्तूचं लोकार्पण होत असेल, तर स्थानिक विद्यमान आमदारांना निमंत्रण देणं आणि त्यांना व्यासपीठावर स्थान देणं अपेक्षित असतं.

राजकीय वर्तुळातील माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला विद्यमान आमदार अमोल खताळ यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. यामुळे खताळ आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. त्यांनी या प्रकाराबाबत वरिष्ठ पातळीवरून मुख्याधिकारी दयानंद गोरे यांची कानउघाडणी केली आणि शासकीय प्रोटोकॉल का पाळला गेला नाही, असा जाब विचारला. यानंतरच प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करत ‘अधिकृत लोकार्पण अद्याप बाकी आहे’ असं जाहीर केल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानही या नाट्यगृहाच्या निधीवरून राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली होती.

दुसरीकडे, संगमनेर नगरपरिषदेत सध्या थोरात-तांबे गटाच्या ‘संगमनेर सेवा समिती’ची सत्ता आहे. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत डॉ. मैथिली तांबे या १० हजारांहून अधिक मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत आणि सेवा समितीचे २२ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे या नाट्यगृहाचं काम पूर्णत्वास नेण्यात आमचाच सिंहाचा वाटा असल्याचा दावा तांबे गटाकडून केला जातोय.

आमदार सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हे नाट्यगृह कलाप्रेमींचं हक्काचं घर ठरल्याचं म्हटलं आणि पहिल्या प्रयोगासाठी प्रशांत दामले यांचे आभार मानले. तर, संगमनेर सेवा समितीच्या गटनेत्या दिपाली पांचारिया यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “दुष्काळी परिस्थितीमुळे या नाट्यगृहाचं लोकार्पण अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आलं. पण विरोधकांना याचा पोटशूळ उठला आहे. ज्यांचं या कामात कोणतंही योगदान नाही, अशा लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या समर्थकांनी राजकीय दबाव टाकून मुख्याधिकाऱ्यांना प्रसिद्धीपत्रक काढण्यास भाग पाडलं.”

या सगळ्या राजकीय रस्सीखेचीत प्रशासनाची कोंडी झाल्याचं स्पष्ट दिसतंय. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी तांत्रिक बाजू पुढे करत सांगितलं की, काम पूर्ण झालं असलं तरी काही किरकोळ कामं शिल्लक आहेत आणि प्रोटोकॉलनुसार अधिकृत उद्घाटन नंतर होईल. मात्र, आपली ही भूमिका मांडण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी फक्त काही ठराविक पत्रकारांनाच बोलावल्यामुळे स्थानिक पत्रकार वर्तुळातूनही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

आता हा सगळा प्रकार पाहिल्यावर संगमनेरकरांना काही प्रश्न पडतात. कोणतीही सार्वजनिक वास्तू ही कोणत्याही एका नेत्याच्या किंवा पक्षाच्या मालकीची नसते, ती करदात्यांच्या पैशातून उभी राहिलेली असते. नगरपरिषदेची सत्ता जरी सेवा समितीकडे असली, तरी आमदार अमोल खताळ हे संगमनेर मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे जर तो अधिकृत लोकार्पण सोहळा होता, तर प्रोटोकॉलनुसार विद्यमान आमदारांना निमंत्रण देणं ही नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी होती. नाट्यगृहाची संकल्पना, पाठपुरावा आणि नूतनीकरण यात बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे आणि नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दीर्घकाळ काम केलं, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे या वास्तूचं श्रेय आपल्याकडेच राहावं, अशी त्यांची भावना असणं राजकारणात स्वाभाविक आहे.

दुसरीकडे, राज्यात महायुतीची सत्ता असताना आणि स्वतः आमदार असताना आपल्याला डावललं गेलं, हे अमोल खताळ यांना खटकणंही तितकंच स्वाभाविक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत एका गटाची सत्ता आणि राज्यात व विधानसभेत विरोधी गटाची सत्ता असली की प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी कसरत होते. इथेही मुख्याधिकाऱ्यांना एका बाजूला स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाला सामोरं जावं लागलं, तर दुसऱ्या बाजूला आमदारांच्या प्रोटोकॉलच्या मुद्द्यामुळे तांत्रिक स्पष्टीकरण द्यावं लागलं. या सगळ्यात सामान्य नागरिकांचा मात्र गोंधळ उडाला की नाट्यगृह सुरू झालंय की अजून उद्घाटन बाकी आहे.

संगमनेरच्या राजकारणात हा वाद केवळ एका नाट्यगृहापुरता मर्यादित नाही. याचे थेट पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर उमटताना दिसणार आहेत. विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये सत्तांतर झालं आणि अमोल खताळ आमदार झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत थोरात-तांबे गटाने एकतर्फी विजय मिळवत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला. आता खरी कसोटी ग्रामीण भागात म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आहे. नाट्यगृहासारखी भव्य वास्तू उभारून तांबे गट तालुक्याला हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय की, सत्तेत असो वा नसो, विकासाची कामं आम्हीच पूर्ण करतो. याचा सकारात्मक फायदा त्यांना निवडणुकीत कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी होऊ शकतो.

दुसरीकडे, अमोल खताळ या मुद्द्याचं भांडवल ग्रामीण भागात करू शकतात. “जनतेने निवडून दिलेल्या आमदाराचा प्रोटोकॉल डावलून एकाच कुटुंबाची मक्तेदारी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा प्रचार महायुतीकडून केला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीतही ‘परिवर्तन’ आणि ‘मक्तेदारीविरुद्ध लढा’ हाच मुद्दा महायुतीच्या पथ्यावर पडला होता. अलीकडच्या काळात संगमनेरमध्ये दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी वाढल्या आहेत.

नाट्यगृह उद्घाटनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तांबे समर्थक आणि खताळ समर्थक आमनेसामने आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर अशा वादांमुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक होतात आणि निवडणुकीचं वातावरण अधिक तापतं. मात्र, या सगळ्या राजकारणात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सामान्य मतदार—विशेषतः तरुण आणि सुशिक्षित वर्ग—हा केवळ श्रेयवादापेक्षा प्रत्यक्ष कामाकडे पाहतो. नाट्यगृह सुरू झाल्याचा आनंद रसिकांना नक्कीच आहे, पण त्यावरून होणारा राजकीय कलगीतुरा मतदारांना कितपत रुचतो, हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.

मित्रांनो, संगमनेरमधील कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या पडद्यावर पहिली घंटा वाजली आहे, नाटकांचे प्रयोगही सुरू झाले आहेत; पण राजकारणाच्या रंगमंचावर मात्र अजून ‘अधिकृत उद्घाटनाचा’ अंक बाकी असल्याचं चित्र आहे. आता प्रशासनाकडून अधिकृत लोकार्पण सोहळा पुन्हा घेतला जातो का? आणि त्या सोहळ्याला तांबे आणि खताळ एकाच व्यासपीठावर येतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? या नाट्यगृहाचं श्रेय कुणाला जायला हवं आणि प्रोटोकॉलवरून सुरू असलेला हा वाद योग्य आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button