
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथून तीन मुली आणि एका लहान मुलाला पळवून नेल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. २५ सप्टेंबर रोजी शेतात गवत आणण्यासाठी गेलेली ही मुले अचानक बेपत्ता झाली होती. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर अपहृत मुलींची सुटका केली आहे.
या प्रकरणी मुलीच्या २१ वर्षीय भावाने तालुका पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार जाफराबाद येथील एका अल्पवयीन आरोपीसह घोडेगाव येथील सागर केशव सौदागर यांच्यावर मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे.
तसेच गौरी आव्हाड, सोनाली आव्हाड आणि दशरथ इंगळे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने बहिणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करून वैद्यकीय तपासणीची मागणी केली आहे.
मात्र, या आरोपाला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. याशिवाय जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





