Explained

सिस्पे घोटाळ्यातील १०० टक्के पैसे परत मिळतील, गुंतवणूकरांनो ‘हे’ गणित समजून घ्या…

हजारो कोटींचा सिस्पे घोटाळा नगरकरांची झोप उडवून गेला. सिस्पे, इनफिनाईट बिकन आणि इतर अनेक घोटाळ्यांची पाळेमुळे शोधताना आर्थिक गुन्हे शाखेला चांगलेच यश मिळाले. या प्रकरणातील संशयीत राहुल काळोखे याला फिजीतून भारतात आणण्यात पोलिसांना यश आले. तो आज अहिल्यानगरला येईल. परंतु या प्रकरणातील गुंतवणूकदारांचे शंभर टक्के पैसे परत मिळतील, अशा शक्यता वाढल्या आहेत. यापूर्वीच्या इतर अनेक घोटाळ्यात, फसवणूक झालेल्यांना फक्त ५० ते ६० टक्के मिळाल्याची उदाहरणे आहेत. परंतु या घोटाळ्यात पहिल्यांदाच पुर्ण गुंतवणूक परत मिळण्याच्या शक्यता दिसत आहेत. आता ते कसं? हेच आपण समजून घेऊ…

श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यांत सिस्पे, इनफिनाईट बिकन व तत्सम कंपन्यांविरोधात एकूण चार गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. सिस्पे घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल शामराव काळोखे याला भारतात आणण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसीद्वारे त्याला फिजी येथून ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी ३० जुलैला त्याला भारतात आणण्यात आले. या गुन्ह्यात गुन्हे शाखेने तब्बल ११४ कोटी ९३ लाखांच्या मालमत्तेच्या जप्तीचा प्रस्ताव, राज्य शासनाला पाठवण्यात आला होता.

या प्रस्तावाला राज्य शासनाने एमपीआयडी नुसार यापूर्वीच मान्यता दिलीय. आता राहुल काळोखेला गुन्ह्याच्या तपासासाठी आणि न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या चौकशीतून या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील इतर दुवे आणि आरोपी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल काळोखे याच्या अटकेमुळे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची कायदेशीर आशा निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आणि तपास यंत्रणांनी एमपीआयडी कायद्यांतर्गत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

एमपीआयडी कायद्यानुसार ११४ कोटी ९३ लाख रुपयांची मालमत्ता व रोकड सध्या न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. न्यायालयाच्या मंजुरीनंतर जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव होईल. या लिलावातून आलेली रक्कम आणि गोठवलेल्या बँक खात्यांमधील पैसे न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात परत केले जातील. शिवाय आता मुख्य संशयीत आरोपी राहुल काळोखेला अटक केल्यानंतर त्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये वैयक्तिक फायद्यासाठी कुठे वळवले, याची अचूक माहिती पोलिसांना मिळेल. त्याच्या चौकशीतून अजून किती मालमत्ता कुठे दडवून ठेवल्या आहेत याचा शोध लागेल. ज्यामुळे जप्तीची रक्कम वाढून गुंतवणूकदारांना अधिक पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

शिवाय हा संपूर्ण घोटाळ्याबाबत आत्तापर्यंत फक्त ११४ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्याच तक्रारी आल्या आहेत. परंतु पोलिसांनी तब्बल २७८ कोटींची मालमत्ता निष्पण्ण केलीय. म्हणजेच जेवढ्या तक्रारी आहेत, त्याच्या २.४ पट मालमत्ता जप्त आहे. सरकारने पहिल्याच टप्प्यात जेवढा घोटाळा झालाय तेवढ्या किंमतीचा एमपीआयडी प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे गुंतवणूकदारांना १०० टक्के रक्कम परत मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

आता हेच गणित आपण समजून घेऊ..
घोटाळा केवढ्याचा झालाय- तर ११४ कोटी ९३ लाखांचा
जप्त केलेली मालमत्ता किती- तर २७८ कोटी
म्हणजेच घोटाळ्याच्या २.४ पट मालमत्ता सध्या जप्त करण्यात आली आहे. त्यात तब्बल २ हजार बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच स्थावर व जंगम मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.
आता गोठविण्यात आलेली रोकड किती आहे- तर ११३ कोटी ३८ लाख रुपये.
स्थावर मालमत्ता किती आहे- तर १ कोटी ५५ लाख रुपये. त्यात प्लॅट, प्लाँट, जमीनी आणि दुकाने आहेत.
शिवाय पोलिसांनी १६३ कोटींच्या मालमत्तेसाठी दुसरा पुरवणी प्रस्तावही शासनाकडे पाठवला आहे.

आता गुंतवणुकदारांना १०० टक्के रक्कम का मिळेल? ते समजून घेऊ…

इतर घोटाळ्यांमध्ये सहसा घोटाळ्याची रक्कम मोठी असते आणि मालमत्ता खूप कमी सापडते. परंतु या प्रकरणात घोटाळ्याच्या रकमेइतका निधी बँक खात्यांमध्ये आणि मालमत्तेच्या रूपात पहिल्या टप्प्यातच कायदेशीररित्या जप्त झाला आहे. त्यामुळे, जर न्यायालयाच्या प्रक्रियेत ही जप्त केलेली रक्कम योग्य पद्धतीने सिद्ध झाली, तर गुंतवणूकदारांना त्यांची मूळ मुद्दल रक्कम पूर्ण किंवा मोठ्या प्रमाणात परत मिळण्याची शक्यता अत्यंत बळकट आहे. आता मुख्य सूत्रधार राहुल काळोखे याच्या अटकेमुळे या जप्त मालमत्तांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button