Explained

Ahilyanagar Crime | मुकुंदनगरमध्ये नेमकं काय झालं? वाद का वाढतोय…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यावर शहरातील मुकुंदनगर भागात जिवघेणा हल्ला झाला. कब्रस्तान परिसरात लाईटचे पोल टाकत असताना या कर्मचाऱ्यावर दहा ते बारा जण शस्त्रास्त्रासह तुटून पडल्याचे सांगितले गेले. अगदी बेशुद्ध पडेपर्यंत या कर्मचाऱ्याला मारण्यात आले. अखेर घटना समजल्यावर पोलिस व पालिका कर्मचारी तेथे गेले आणि त्या जखमी कर्मचाऱ्याला अत्यवस्थ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कर्मचाऱ्यावर अजूनही अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. हा जखमी कर्मचारी मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर पोलिस, पालिका कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनीधी रुग्णालयात जमा झाले.

एफआयआरही दाखल झाली. परंतु या भागात घडलेली ही पहिलीच घटना होती का? तर नाही. या मारहाणीनंतर पालिका कर्मचारी युनिअनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या बाईट, अगदीच भयंकर होत्या. या पदाधिकाऱ्यांनी घटना घडलेल्या भागातील दहशत थेट बोलून दाखवल्यानंतर, एकच खळबळ उडाली. आता मुकुंदनगर परिसरातील सगळ्याच नागरी सुविधांवर या कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय. पाणी, स्वच्छता, पथदिवे, असं सगळंच ठप्प झालंय. काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा, सगळ्याच त्रास सहन करावा लागत आहे. नेमकं काय झालंय? आणि पालिका कर्मचारी संतप्त का झालेत? हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत…

नगर शहरातील मुकुंदनगर परिसर हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शुक्रवारी दुपारी पालिकेचे कर्मचारी या भागात पथदिव्यांचे पोल टाकण्याचे काम करत होते. साधारणः सायंकाळी चार-सव्वाचारच्या सुमारास दर्गादायरा कब्रस्तानजवळ हे कर्मचारी पोल टाकत असतानाच एक जमाव तेथे आला. त्यांनी पोलचे काम करत असणाऱ्या धीरज परदेशी यांच्याशी वाद घातला. बोलणे सुरु असतानाच अचानक काहींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने काठ्या, गज व अगदी तलवारीसारख्या हत्यारांनी हल्ला केल्याचं उपस्थितांचं म्हणणं होतं. हा जमाव एवढा उग्र होता की, परदेशी यांना बचावच करता आला नाही.

सरकारी काम सुरु असताना थेट एका कर्मचाऱ्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारण्याची या टोळक्यांची हिम्मत झाली. अखेर गदारोळ झाल्यानंतर हे टोळके पळून गेले. अजून काही मिनिटे ही मारहाण सुरु राहिली असती, तर या कर्मचाऱ्याच्या जीवाचे नक्कीच बरेवाईट झाले असते.

अखेर सायंकाळी उशीरा, या कर्मचाऱ्याला बेशुद्ध अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी केली. एका संशयिताला ताब्यातही घेतले गेले. आता इतर फरार हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. आता हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा तपास सुरु आहे. पूर्ववैमनस्यातून, वादातून की तात्कालिक कारणावरून हा प्रकार घडला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. शिवाय काही प्रत्यक्षदर्शींचाही जबाब घेतला जात आहे.

या जीवघेण्या हल्ल्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे महापालिका कर्मचारी संघटनेने मुकुंदनगर भागातील नागरी सेवा आणि पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. सर्व आरोपींना तात्काळ अटक होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. रात्री उशीरा पालिका कर्मचारी युनिअनने काही काळ आंदोलनही केले. वाद वाढल्यानंतर, अखेर हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले. या घटनेची गांभीर्य पाहून स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमी धीरज परदेशी यांच्या तब्येतीची विचारपूस केली व डॉक्टरांशी चर्चा केली. रात्रभर मुकुंदनगर भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

ही झाली घटनेची एक बाजू. आता कर्मचारी युनिअनच्या आंदोलनात काही पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले. मुकुंदनगर परिसरात, पालिका कर्मचाऱ्यांवर कायम दादागिरी होत असल्याचा गंभीर मुद्दे उपस्थित होऊ लागले. पहाटे पाच वाजेपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दादागिरी सुरु होते. ती दिवसभर पाणी, नागरी सुविधा आणि इतर सगळ्यात सेवेत कायम राहते, असं पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. यापूर्वीही पालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिविगाळ, धमक्या, मारहाण असे प्रकार घडले होते. परंतु शुक्रवारची घटना अत्यंत गंभीर होती.

थेट दहा ते पंधरा जणांच्या जमावाने प्री-प्लॅन हल्ला केला होता. त्यामुळे पालिकेचे कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी शुक्रवारी रात्रीपासूनच मुकुंदनगर प्रभागातील सर्व कामे बंद केली. रात्री सुटणारे पाणीही सोडले नाही. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत कोणतेही काम केले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला. सध्या कर्मचारी संघटनेने फक्त मुकुंदनगरचा पाणीपुरवठा बंद केला आहे. मात्र, जर ४८ तासांत सर्व आरोपींना अटक झाली नाही, तर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण अहिल्यानगरकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. वीज, पाणी, स्वच्छता यांचा बोजवार उडू शकतो.

पालिका कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले ही निश्चित गंभीर बाब आहे. हे थांबले नाही तर, भविष्यात जेथे दादागिरी केली जाते तेथे पालिकेचा कोणताच कर्मचारी जाणार नाही. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन, याबाबत लगेच ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button