राहुरीत तालुक्यातील आदीवासी समाजाच्या एका १५ वर्षिय मुलीनं आत्महत्या केली. राहत्या घरात साडीची दोरी बनवून, या मुलीनं आपलं जीवन संपवलं. आपल्या मुलीचा छळ होत होता, तिचा पाठलाग होत होता, असं तिच्या आई-वडिलांनी सागूनही राहुरी पोलिस गप्प बसले. अखेर आदिवासी एकलव्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी, थेट पोलिस उपअधिक्षकांकडे निवेदन देऊन आंदोलनाची इशारा दिल्यावर पोलिसांना जाग आली. तब्बल आठ दिवसांनी राहुरी पोलिसांनी तालुक्यातीलच एका तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या तरुणाच्या सततचा छळाला, जाचाला, पाठलागाला आणि धमक्यांना घाबरून, आपल्या मुलीनं आत्महत्या केल्याचा पिडीतेच्या वडिलांचा आरोप आहे. हे सगळं प्रकरण अगदीच धक्कादायक आहे. नेमकं काय झालंय?
सोमवारी २७ जुलैला राहुरी तालुका हादरला. एका १५ वर्षीय आदिवासी समाजातील मुलीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. २६ जुलैच्या रात्री उशीरा मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं होतं. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आपल्या पोटच्या गोळ्याला फासावर लटकलेलं पाहिल्यावर आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेची तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर राहुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीला राहुरी येथील रुग्णालयात आणले. परंतु डाँक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. त्यानंतर या घटनेमागच्या कारणाची चर्चा सुरु झाली.
एवढ्या कोवळ्या वयात या लेकरानं आत्महत्या का केली? अशा चर्चा सुरु झाल्या. तालुक्यातील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून या मुलीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांचा आधार घेतला तर, एका तरुणाच्या पाठलागाला आणि सततच्या त्रासाला कंटाळून या मुलीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं गेलं. परंतु राहुरी पोलिसांनी फक्त चर्चांच्या आधारावर तपास सुरु ठेवला.
अखेर आठ दिवस उलटूनही पोलिस संशयीत तरुणाला अटक करत नसल्यानं आदिवासी समाज संतप्त झाला. राहुरी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. एकलव्य आदिवासी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाचचौरे यांची भेट घेऊन, त्यांना या गंभीर प्रकाराबाबत निवेदन दिलं. संशयीत आरोपीला तत्काळ अटक न केल्यास ६ ऑगस्टला राहुरी पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. आदिवासी संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर व वाढत्या जनक्षोभानंतर अखेर पोलिसांना जाग आली. त्यानंतर राहुरी पोलिसांनी या विद्यार्थीनीच्या वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावले आणि संशयीत तरुणावर गुन्हा दाखल केला.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयीत आरोपी साहिल सिकंदर पठाण हा त्यांच्या मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. शाळेच्या परिसरात, घराच्या परिसरात, गावात तसेच येण्या-जाण्याच्या रस्त्यावर थांबून साहिल हा आपल्या मुलीला धमकावत होता. आपल्याशी संबंध ठेव, यासाठी बळजबरी करत होता. साहिलच्या याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला. पोलिसांनी या फिर्यादीवरून साहिल सिकंदर शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमानुसार पोक्सो, अनुसूचित जाती-जमाती कायदा, आत्महत्येस प्रवृत्त करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
घटनेला आठ दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली हे विशेष. आता श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर हे या घटनेता अधिक तपास करत आहेत. हे सगळं धक्कादायक होतं. शाळेत जाणाऱ्या १५-१६ वर्षांच्या लेकरासोबत घडलेली ही घटना नक्कीच गंभीर होती. पालकांनी आपल्या पाल्याशी योग्य संवाद साधून, त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत नक्कीच चर्चा करावी हे यानिमित्तानं पुढं आलं. पालक, ग्रामस्थ व पोलिसांनीही शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत टवाळखोरांवर लक्ष्य ठेवावं, अशी मागणी होत आहे.





