
संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
हिवरगाव पठार परिसरातील सुतारवाडी, पायरवाडी, कौठे मलकापूर, कुंभारवाडी, जांभूळवाडी आणि पिंपळगाव देपा भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.
नुकसानग्रस्त पिकांचे कोणताही भेदभाव न करता सरसकट पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन खताळ यांनी दिले.
महत्त्वाचे म्हणजे, एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये आणि दिवाळीपर्यंत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा व्हावी, यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे खताळ यांनी स्पष्ट केले. आता पंचनामे आणि प्रत्यक्ष मदत किती वेगाने मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





