Explained

फक्त श्रावणी सोमवारीच बारवेतून गंगा कशी प्रकट होते? ढोरजे येथील मंदिराचे न उलगडलेले रहस्य

मित्रांनो, जरा विचार करा… एक अशी दगडी विहीर, जी हुबेहूब एका शिवपिंडीच्या आकाराची आहे. वर्षभर तिचं पाणी शांत असतं. पण… वर्षातून फक्त एकच असा दिवस येतो, जेव्हा या विहिरीमध्ये निसर्गाचे सगळे नियम मोडीत निघतात! कोणतीही मोटर नाही, कोणतीही नदी जोडलेली नाही, तरीही जमिनीखालून हजारो लिटर पाणी अचानक वर उफाळून येतं.

हे पाणी ठरावीक दिवशीच उफाळतं. पण त्याला ठराविक वेळ नसते. परंतु पहाटेचे ३ वाजल्यापासून संपूर्ण गाव या चमत्काराची वाट पाहत उभं असतं. पाणी प्रकट होतं… बरोबर अडीच तास तिथं थैमान घालतं… शिवलिंगाला स्पर्श करतं… आणि नंतर, जसं आलं होतं तसंच अचानक गायब होतं! ना सायन्सकडे याचं उत्तर आहे, ना भूगर्भ शास्त्रज्ञांकडे! हे पाणी येतं कुठून? आणि फक्त श्रावणाच्या पहिल्या सोमवारीच का येतं?

मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातल्या ढोरजे गावातील श्री काशीविश्वनाथ मंदिरात… जिथलं रहस्य ऐकून वैज्ञानिकही चक्रावलेत!

अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका आहे. याच श्रीगोंदा शहरापासून १८ किलोमीटरवर ढोरजे नावाचं एक छोटंसं पण निसर्गरम्य गाव वसलेलं आहे. या गावाच्या कुशीत प्राचीन काळापासून उभे आहे ‘काशीविश्वनाथ देवस्थान’. पहिल्या नजरेत हे मंदिर इतर मंदिरांसारखंच शांत वाटतं. पण या मंदिराच्या शेजारी जी रचना आहे, ती तुम्ही जगात कुठेही पाहिली नसेल. या मंदिराच्या अगदी शेजारी आहे एक दगडी बारव. म्हणजेच पायऱ्यांची विहीर. या विहिरीची रचना प्राचीन स्थापत्यशास्त्राचा एक अद्भूत नमुना आहे. वरून पाहिलं तर ही बारव हुबेहूब एका ‘शिवपिंडीच्या’ आकाराची दिसते.

पूर्वजांनी ही विहीर अशी का बांधली? यामागे फक्त कलाकुसर होती की काही वेगळंच गणित होतं? हे व्हिडीओत तुम्हाला पुढे समजेलच. पण या बारवेचं एक वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्रात उन्हाळ्यात कितीही भीषण दुष्काळ पडला, तरी या शिवपिंडी बारवेतील पाणी आटत नाही. बाराही महिने ही बारव पाण्याने थोडीफार का होईना पण भरलेली असते. ढोरजे येथील या बारवेच्या शेजारी दोन मंदीरे आहेत. त्या मंदिराला ‘प्रति-काशी’ म्हणतात. आता त्याला प्रतिकाशी का म्हणतात? आणि महादेव स्वतः काशी सोडून या छोट्याशा ढोरजे गावात का आले? यामागे शेकडो वर्ष जुनी एक आख्यायिका सांगितली जाते.

गोष्ट आहे ढोरजे गावाजवळ असलेल्या ‘शिरुडी’ गावच्या ‘काशिनाथ’ नावाच्या एका परमभक्ताची. काशिनाथ हे महादेवाचे मोठे भक्त होते. ते दरवर्षी श्रावण महिन्यात काशिला जायचे. शेकडो किलोमीटर चालचे. वर्षानुवर्षे त्यांची ही वारी अखंड सुरू होती. वयोमानानुसार काशिनाथ वृद्ध झाले. अंगातलं बळ कमी झालं. पण मनातली भक्ती कमी झाली नाही. एका वारीदरम्यान, काशीमध्ये स्वतः भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले. महादेव प्रकट झाले आणि म्हणाले, ‘काशिनाथ, माग काय वर मागतोस!’ काशिनाथ डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, ‘देवा, आता माझं शरीर थकलंय. पुढच्या वर्षापासून मला काशीला येता येणार नाही. मला तुमची सेवा करायची आहे, तुम्ही माझ्यासोबत माझ्या गावी चला…’

असं सांगतात की, भक्ताच्या आग्रहाखातर जगाचा पाठीराखा महादेव, याच शिरुडी गावात यायला तयार झाला. पण त्यांनी एक अट घातली. महादेव म्हणाले की, ‘काशिनाथ, मी तुझ्या मागे-मागे येईन. पण लक्षात ठेव, संपूर्ण प्रवासात तू एकदाही मागे वळून पाहायचं नाहीस. ज्या क्षणी तू मागे पाहशील, मी त्याच ठिकाणी कायमचा थांबेन!’

काशिनाथ महादेवांना सोबत घेऊन आनंदाने गावाकडे निघाले. पुढे भक्त, मागे देव. मैलोन्मैल प्रवास झाला. जेव्हा ते ढोरजे गावाच्या सीमेत आले. हे गाव एवढं निसर्गरम्य होतं, की भगवान महादेव त्या ते निसर्गसौंदर्य पाहत काही वेळ तेथेच थांबले. काशिनाथ पुढे चालत होता. पण महादेवांच्या पावलांचा आवाज येणे बंद झाल्याने काशिनाथ यांनी मागे वळून पाहिलं!… अटीचा भंग झाला होता. महादेवांनी स्मितहास्य केलं आणि ते त्याच ठिकाणी गुप्त झाले. ज्या जागी महादेव थांबले, तिथेच हे स्वयंभू शिवलिंग प्रकट झालं! हे शिवलिंग स्वतः काशीहून निघालेल्या काशिविश्वनाथाचं आहे, म्हणूनच या गावाला आणि मंदिराला ‘प्रति-काशी’चा दर्जा मिळाला.

काही काळानंतर या ठिकाणी महादेवाचे विश्वनाथ मंदिर आणि भक्ताचे काशिनाथ मंदिर अशी दोन मंदिरे उभारण्यात आली. कालांतराने काशिनाथ-विश्वनाथांची मंदिरे काशी विश्वनाथ म्हणून प्रसिद्ध झाली. यादवकालीन स्थापत्य रचना असलेली काशिनाथ आणि विश्वनाथ ही मंदिरे १२ व्या ते १४ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. महादेव आणि काशिनाथ काशीवरून पश्चिम दिशेला चालत असताना काशिनाथांनी मागे वळून पूर्वेकडे असलेल्या महादेवांकडे पाहिले, त्यामुळे काशिनाथ मंदिर हे पूर्वाभिमुख, तर विश्वनाथ मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. या मंदिर परिसरात असलेल्या एका कातळावर अगस्ती ऋषींनी काही काळ तपश्चर्या केली होती. विश्वनाथ मंदिराच्या समोर काशिनाथ मंदिर आहे. विश्वनाथांचे दर्शन घेण्याआधी काशिनाथ मंदिरात दर्शन घेण्याची पद्धत आहे.

पण मित्रांनो, कथा इथे संपत नाही. काशिनाथ मंदीराच्या शेजारीच एक शिवपिंडीच्या आकाराची बारव आहे. त्या बारवेत कायम पाणी असते. दरवर्षी श्रावणातील पहिल्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. याच यात्रेदरम्यान या बारवेत एक रहस्यमयी घटना घडते. स्थानिक लोकांच्या मते, महादेवांनी काशिनाथ यांना सांगितलं होतं की, ‘जरी मी इथे थांबलो असलो, तरी दरवर्षी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी काशीची पवित्र गंगा मला भेटायला इथे नक्की येईल.’ आणि हाच तो चमत्कार आहे, जो आज २१ व्या शतकातही कायम आहे. होतं असं की, या बारवेतील पाण्याला श्रावणातील पहिल्या सोमवारी अचानक भरती येते. या भरतीची वेळ फिक्स नसते. परंतु पहाचे तीन वाजेपासून भाविक ही भरती पाहण्यासाठी गर्दी करतात. अचानक शांत असलेल्या विहिरीच्या पाण्याचा प्रवाह बदलतो.

जमिनीखालून प्रचंड वेगाने पाणी उफाळू लागतं. विहीर पूर्ण भरते आणि पाणी बाहेर वाहू लागतं. लोक याला ‘गंगा प्रकट झाली’ असं म्हणतात. हा प्रकार होताच महादेवाच्या नावाने जयघोष करतात. गावातील अनेक दाम्पत्य या पवित्र पाण्याने काशीविश्वनाथाचा अभिषेक करतात. पण या चमत्काराचा सर्वात मोठा ट्विस्ट आता पुढे आहे… बरोबर अडीच तासांनी पाण्याची ही भरती अचानकपणे ओहटीत बदलते. वाढलेलं पाणी अचानक गायब होतं. विहीर पुन्हा शांत होते. हे अडीच तासांचं चक्र काय आहे? हे पाणी फक्त पहिल्या सोमवारीच कसं येतं? दुसऱ्या किंवा तिसऱ्या सोमवारी का येत नाही? हेच ते न उलगडलेलं कोडं आहे.

भाविक याला काशिविश्वनाथाचा चमत्कार मानतात. पण भुगर्भशास्त्रज्ञाला काय वाटतं? हेही पहावं लागतं. काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, निसर्गात काही दगडी किंवा जमिनीखालील पोकळ्या असतात. ज्या एका विशिष्ट पातळीपर्यंत पाणी भरल्यानंतर ‘सायफन’ प्रक्रियेसारख्या कार्यरत होतात. श्रावणाच्या सुरुवातीला पावसाळ्यात जमिनीखालील पाण्याचा दाब वाढल्यामुळे त्या विशिष्ट बारवेच्या मुखातून अचानक पाणी वेगाने वर येते आणि दाब संपल्यावर साधारण अडीच तासांनी ते पाणी पुन्हा ओसरतं. परंतु, हे फक्त श्रावणी सोमवारच्याच दिवशी आणि तेही ठराविक वेळेत का घडतं? याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे किंवा अचूक उत्तर अजूनही समोर आलेले नाही. थोडक्यात सांगायचे तर, काशिनाथ भक्ताची कथा हा या मंदिराचा श्रद्धा आणि भक्तीवर आधारित इतिहास आहे, तर श्रावणी सोमवारी अचानक पाणी येणे आणि गुप्त होणे हे निसर्गाचे एक अनोखे, न उलगडलेले रहस्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button