
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे २७ वर्षीय आशिष पारखे या तरुणाचा मृतदेह घराच्या पडवीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष रात्री घराच्या पडवीत झोपला होता. त्याचा मोठा भाऊ शेजारीच राहत होता.
रात्री शिर्डीहून लहान भाऊ घरी आणि झोपलेला दिसला. मात्र सकाळीही आशिष त्याच अवस्थेत पडलेला आढळला. आशिषला उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो मृत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आशिषच्या मानेवर मार लागल्याच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच मानेवरील जखम आणि लाकडी दांड्यावरील कोळशाचे चिन्ह यामुळे त्याला दांड्याने मारहाण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र हा नेमका खून आहे की मृत्यूमागे दुसरे कारण आहे, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





