
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान उत्तर हिंद महासागरात तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळे तयार होण्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज इस्रोच्या हंगामी मॉडेलमधून समोर आला आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील उबदार पाणी, वातावरणातील आर्द्रता आणि मोसमी वाऱ्यांमुळे कमी दाबाच्या प्रणाली तयार होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
हवामानाच्या या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाचे सत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे काही भागातील पाणीटंचाईला दिलासा मिळू शकतो, मात्र शेती आणि नागरिकांसाठी अतिवृष्टीचे आव्हानही निर्माण होऊ शकते.
दरम्यान, महाराष्ट्रात २२ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहू शकतो.
१९ सप्टेंबरपासून राजस्थानातून मान्सूनच्या परतीला सुरुवात होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.





