
अहिल्यानगरसह राज्यातील प्रवासी वाहन चालकांच्या मुलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे नाव बदलून आता ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असं करण्यात आलं आहे.
नव्या नियमावलीनुसार केवळ ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकच नाही, तर ॲपवर आधारित कॅब चालक, पर्यटन वाहन चालक आणि इतर प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांच्या मुलांनाही शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील ६५० प्रवासी वाहन चालकांनी मंडळाकडे नोंदणी केली आहे. नोंदणीकृत चालकांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे.
याशिवाय आतापर्यंत २३ ज्येष्ठांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी अधिकाधिक प्रवासी वाहन चालकांनी मंडळाकडे नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे.





