
बिहारमधील मोनू चव्हाण याची ही कहाणी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. आईच्या आरोग्यासाठी मोनूने १२ ज्योतिर्लिंग आणि चार धामांच्या दर्शनाचा अनोखा संकल्प केला आहे.
बिहारमधील पाटणा-बैतौरा येथून सुरू झालेली त्याची धावती यात्रा तब्बल ३६५ दिवसांची आहे. या काळात ८ हजार किलोमीटर अंतर धावत पूर्ण करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.
‘बिहार का बेटा मोनू बेटोरावाला’ आणि सोशल मीडियावर ‘ब्लॅक पॅंथर’ म्हणून ओळखला जाणारा मोनू महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर सिन्नर, अकोले, संगमनेर आणि जुन्नरमार्गे तो कोपरगाव आणि शिर्डी परिसरात पोहोचला. येथे ग्रामस्थ, शिवभक्त आणि मान्यवरांनी त्याचे उत्साहात स्वागत केले.
आईच्या आरोग्यासाठी घेतलेला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोनूची धाव अजूनही सुरू आहे. त्याच्या या प्रवासामागे केवळ श्रद्धा नाही, तर आईवरील अपार प्रेम आणि जिद्दही आहे.





