
नवरात्रोत्सवात उपवासासाठी भगर खाल्ली… पण काही वेळातच अनेकांना मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला! अखेर काहींना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. नेमकं घडलं तरी काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीगोंदे परिसरात ही घटना समोर आली आहे. राहुरी शहर, येवले आखाडा, राहुरी स्टेशन आणि वाघाचा आखाडा येथील सुमारे १० ते १५ जणांना त्रास झाल्याची माहिती आहे. तर श्रीगोंदे फॅक्टरी परिसरातही अनेक नागरिकांची प्रकृती बिघडली.
यामध्ये प्रा. बाळासाहेब जगन्नाथ जाधव, सुमनबाई जाधव आणि सुरेश पटारे यांच्यासह अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांना पुढील उपचारांसाठी अहिल्यानगरला हलवण्यात आल्याची माहिती आहे.
श्रीगोंद्यात सुनंदा शेळके, उज्वला शेजवळ, आरती राहुल सावंत, द्रौपदाबाई बाबर, गोपीचंद गोंडे, अमोल राऊत, सुनीता सुभाष बाबर आणि स्वप्नाली नाथा सावंत यांनाही त्रास झाल्याचे सांगण्यात येते.
मात्र, या सर्वांच्या त्रासामागे भगरच कारणीभूत आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता प्रयोगशाळेतील तपासणी आणि प्रशासनाच्या चौकशीतून नेमकं कारण समोर येणार आहे.





