
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, याच भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दुकानदारांविरोधात आता नगरपरिषदेने कठोर कारवाई सुरू केली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नियमांचा भंग करणारी तब्बल १६ दुकाने सील करण्यात आली आहेत. यातील ३ दुकानदारांवर दुसऱ्यांदा फसवणूक केल्यामुळे तब्बल १५ दिवस दुकान बंद ठेवण्याची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान संबंधित दुकानदारांकडून एकूण ९० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. शिर्डीतील हार, फुले विक्री आणि बाजार व्यवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी निर्देश दिले होते. त्यानंतर नगरपरिषदेने नियम अधिक कडक केले आहेत.
मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी स्पष्ट केले की, भाविकांची आर्थिक फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. कोणाचीही शिफारस न पाहता कारवाई केली जाईल. पुढे नियमभंग झाल्यास दुकान १ महिना सील आणि २५ हजार रुपयांचा दंड होणार आहे.





