
पावसाचे पुनरागमन झाले असले, तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाची तूट कायम आहे. एलनिनोच्या प्रभावामुळे जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ४१३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा केवळ २९५ मिलिमीटर म्हणजेच ७०.५ टक्के पावसाची नोंद झाली. सप्टेंबरमध्येही सरासरी ११२ मिलिमीटरच्या तुलनेत फक्त ४१ मिलिमीटर पाऊस झाला.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी भूजल उपशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटर परिसरात, पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नवीन विहीर खोदण्यास परवानगी दिली जाणार नाही.
राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हा निर्णय घेतलाय. म्हणजे याची अंमलबजावणी अहिल्यानगरसह संपूर्ण राज्यात होणार आहे.
विशेष म्हणजे टंचाई निर्माण झाली म्हणून थेट टँकर सुरू करण्याऐवजी उपलब्ध पाणीस्रोत, पर्यायी व्यवस्था आणि इतर तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
संभाव्य टंचाईग्रस्त गावांची आणि वाड्यांची यादी तयार करून प्रत्येक गावासाठी स्वतंत्र कृती आराखडा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.





