
अहिल्यानगरमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी युवतीने करिअर अकादमीच्या संचालकावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
मंडळी, बीड जिल्ह्यातील या युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवरक्षक करिअर अकादमीचे संचालक योद्धा राजे पवार यांनी तिला जुन्या हॉस्टेलमध्ये राहण्यास सांगितले.
नकार दिल्यानंतर शिक्षा म्हणून क्लासरूम आणि कार्यालय साफ करण्यास लावल्याचा आरोप आहे. तसेच, आपल्याला आवडत असल्याचे सांगून वारंवार त्रास दिला आणि १७ जुलै रोजी कार्यालयात बोलावून गैरवर्तन केल्याचा दावा युवतीने केला आहे.
हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. ३ सप्टेंबरला युवतीने आईला अकादमीत बोलावून संपूर्ण प्रकार सांगितला.
आईने संचालकाकडे विचारणा केली असता, आपल्याला आणि आईला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या फिर्यादीवरून ९ सप्टेंबर रोजी योद्धा राजे पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





