
अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथे दिपाली प्रकाश रोकडे या शेतकरी महिलेने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. २३ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली, तर २४ सप्टेंबरच्या पहाटे हा प्रकार समोर आला.
रोकडे कुटुंबाकडे साडेतीन ते चार एकर शेती आहे. शेती आणि मोलमजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, कमी पावसामुळे खरीप हंगामातून अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. त्यात घर बांधण्यासाठी घेतलेलं कर्ज, बँक आणि सेवा सोसायटीचं कर्ज, खेळत्या भांडवलाचं कर्ज अशी आर्थिक जबाबदारी कुटुंबावर होती.
काही दिवसांपूर्वी दिपाली यांच्यावर आजारपणामुळे उपचारही झाले होते. उपचारांचा खर्च आणि कर्जफेडीचा ताण वाढत गेला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि सासू असा परिवार आहे.
या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष बांधावर मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





