
अहिल्यानगरमध्ये नागरिकांना पाण्यासाठी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घ्यावी लागत आहे आणि यामागचं कारण ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.
मंडळी, महापालिका दरवर्षी लाखो रुपयांची पाणीपट्टी नागरिकांकडून वसूल करते. पण प्रत्यक्षात मात्र नागरिकांना पाणीच मिळत नसल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे.
बुरुडगाव रोडवरील विनायकनगर परिसरातील आनंदबाग रेसिडेन्सीमधील रहिवाशांनी आता थेट मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. येथील नागरिक गेल्या १५ वर्षांपासून नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत आहेत.
फक्त या सोसायटीतूनच दरवर्षी सुमारे ५ लाख रुपयांची पाणीपट्टी महापालिकेकडे जमा होते. पण धक्कादायक बाब म्हणजे २०२४ पासून या भागाला नियमित पाणीपुरवठाच झालेला नाही.
गेल्या चार महिन्यांपासून तर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. परिसरात पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव टँकर आणि बोअरिंगच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत आहे.
अशुद्ध पाणी प्युरिफायर लावून पिण्याची वेळ लोकांवर आली आहे. आता मुख्यमंत्री कार्यालय या तक्रारीची दखल घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





